विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : आता एक दुर्दैवी बातमी संभाजीनगरमधून. एका 10 वर्षांच्या लहानग्या मुलाचा रस्त्यानं बळी घेतला. होय, एका रस्त्यानं आणि गेंड्याच्या कातडीच्या सरकारी व्यवस्थेनं या निष्पाप मुलाचा बळी घेतलाय. ग्रामीण भागात रस्त्यांच्या नावाखाली सगळा कसा चिखल झालाय, पाहूयात हा रिपोर्ट. (10 year children death due to potholes at sambhajinagar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा आक्रोश आहे एका आईचा. लाडाकोडात वाढवलेल्या मुलाच्या मृत्यूनंतर तिनं फोडलेला हा हंबरडा. अवघ्या 10 वर्षांचा तिचा मुलगा आता या जगात नाही. कारण एका रस्त्यानं तिच्या पोटच्या मुलाचा बळी घेतला. हाच तो यमदूत बनललेला संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातला लखमापूरचा रस्ता. याला रस्ता तरी कसं म्हणायचं?


ग्रामीण भागात रस्त्यांची कशी चिखलमाती झालीय, पाहा, हाच रस्ता लहानग्या कृष्णाच्या जीवावर उठला. पोटदुखी आणि उलट्या होत असल्यानं कृष्णाला दवाखान्यात नेण्यासाठी वडिलांनी मोटार सायकल काढली. पण या चिखलात त्यांची मोटारसायकल रूतून बसली. मोठ्या कष्टानं, तासाभराच्या मेहनतीनंतर चिखलमाती तुडवत त्यांनी कसाबसा दवाखाना गाठला. पण तोवर खुप उशीर झाला होता. वाटेतच कृष्णाचा दुर्दैवी अंत झाला.


गावातून बाहेर यायचं असेल तर लखमापूरवाल्यांना हा एकच रस्ता आहे. अगदी शेतात जायचं असेल तरी याच वाटेनं जावं लागतं. पण ही वाट आता थेट मृत्यूच्या दारात पोहचत असल्यानं गावक-यांच्या संतापाचा बांध फुटलाय...वारंवार तक्रारी करूनही सुस्तावलेली सरकारी यंत्रणा रस्ता दुरूस्त करायला तयार नाही.


वर्षानुवर्षे रखडलेल्या यावरून आता राजकारण सुरू झालंय...महाविकास आघाडी सरकारच्या काळात रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानं या रस्त्याचं काम रखडल्याचा आरोप स्थानिक भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय.


रस्त्यामुळे चिमुकल्याचा बळी गेल्याचं वृत्त झी २४ तासनं दाखवल्यानंतर हा रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन आमदार बंब यांनी दिलंय. मात्र प्रश्न हा आहे की, मुर्दाड सरकारी यंत्रणा बळी जाण्यापूर्वी जागी का होत नाही? 


राज्याच्या कानाकोप-यात काही घडलं की, व्हिडिओ कॉल करून मुख्यमंत्री महोदय मदतीचा हात देतात. वेळप्रसंगी ते सरकारी यंत्रणेला धारेवरही धरतात. तेच मुख्यमंत्री साहेब संभाजीनगरच्या या रस्त्याकडं कधी लक्ष देणार? चिमुकल्या कृष्णाचा बळी घेणा-यांचे कान मुख्यमंत्रीसाहेब उपटणार का? हाच सवाल आहे.