लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने 10 वर्षाच्या मुलाने गमवला हात
लिफ्टमध्ये अडकून १० वर्षीय मुलाचा हात कोपरापासून तुटल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : लिफ्टमध्ये अडकून १० वर्षीय मुलाचा हात कोपरापासून तुटल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये खळबळ माजली आहे. अंबरनाथच्या पश्चिम भागातील कोहोजगावमध्ये मंगळवारी ही घटना घडली. केणे हाईट्स या गृहसंकुलात राहणारा असद खान हा १० वर्षांचा मुलगा लिफ्टने जात असताना अचानक दरवाजा बंद झाला आणि त्यात असदचा हात अडकला. मात्र लिफ्ट न थांबल्यामुळे असदचा हात कोपरापासून अक्षरशः तुटून वेगळा झाला.
या घटनेनंतर असदला आधी अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात आणि तिथून मुलुंडच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. असदवर तिथे आत्तापर्यंत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्याचा हात मात्र त्याने कायमचा गमावला आहे.
हल्ली प्रत्येकच इमारतीत लिफ्ट असते. इमारतीतल्या वरच्या मजल्यांवरच्या फ्लॅटमध्ये वेगानं जाण्यासाठी लिफ्टचा पर्याय सोपा वाटतो. पण हीच लिफ्ट मृत्यूचं दार ठरु लागली आहे. अंबरनाथमध्ये एका दहा वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून हात तुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जात असताना लिफ्टच्या दरवाज्यात त्याचा हात अडकला. अशातच लिफ्ट सुरू झाली. गंभीर जखमी झालेल्या मुलावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. पण यात त्याने त्याचा हात कायमचा गमावला.
लिफ्ट वापरताना काही गोष्टी सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. इमारतीच्या लिफ्टमध्ये लिफ्टमन नेमावा. लिफ्टमन नसल्यास प्रौढांनीच लिफ्ट हाताळावी. लहान मुलांना लिफ्टमध्ये एकटं सोडू नये. वयोवृद्ध नागरिकांनीही लिफ्टचा सावधगिरीनं वापर करावा. लिफ्टची वारंवार तपासणी करवून घ्यावी. लिफ्ट वापरतानाचे धोके गेल्या काही वर्षांपासून अधोरेखित होऊ लागले आहेत. त्यामुळं लिफ्ट वापरताना काळजी घ्या. नाहीतर एखादा अपघात तुमच्यासमोर वाढून ठेवलेला असेल.