11 Police Officers Suspended In Kalyan: कल्याणमध्ये एका चप्पलेमुळे तब्बल 11 पोलिसांची नोकरी गेल्याची विचित्र घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आता उमटले असून या एका चप्पलेमुळे 11 पोलिसांचं निलंबन झालं आहे. कल्याणच्या उपायुक्तांनी ही कठोर कारवाई केली असून 11 जण निलंबित झालेत. नक्की हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात...


नेमकं हे प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सारा प्रकार 21 डिसेंबर रोजी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात घडला होता. दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरु असताना एका किरकोळश्या कारणावरुन आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या 22 वर्षीय किरण संतोष भरम नावाच्या तरुणाने अतिरिक्त व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या दिशेने पायातली चप्पल भिरकावली. न्यायमूर्तींच्या दिशेने आरोपीने चप्पल फेकून मारल्याने न्यायालयामध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकरणामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या आरोपाखाली आरोपीविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशीला सुरुवात झाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. मात्र हा तपास सुरु असतानाच आता पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. 


कोर्टात नक्की काय घडलं?


खडकपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात किरण भरमला शनिवारी दुपारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जी. वाघमारे यांच्या समोर दिलेल्या तारखेप्रमाणे हजर करण्यात आलं. किरणनने न्यायालयामध्ये दुसऱ्या न्यायाधीशांकडे सुनावणी करण्याची मागणी केली. न्यायालयाने किरणला तुमच्या वकिलामार्फत तसा अर्ज द्यावा, असे सांगितलं. यानंतर न्यायालयीन सेवकाने इसमाच्या वकिलाच्या नावाचा पुकारा करत वकिलाने हजर राहण्याचे सूचित केले. इसमाचा वकील न्यायालयासमोर आलाच नाही. न्यायालयाने आरोपी किरणला दुसरा वकील देण्याची सूचना केली आणि याप्रकरणी पुढील तारीख दिली. न्यायालयाने पुढची तारीख दिल्यानंतर किरणने आरोपीच्या पिंजऱ्यामध्येच खाली वाकत पायाची चप्पल काढली आणि हातात घेऊन आजूबाजूच्या पोलिसांना काही कळण्याआधीच ती न्या. वाघमारेंकडे भिरकवली.


नक्की वाचा >> कल्याण हत्या प्रकरण: फडणवीस Action मोडमध्ये! पोलीस आयुक्तांना फोनवरुन आदेश; म्हणाले, 'आरोपीला..'


सुदैवाने चप्पल न्यायमूर्तींपर्यंत पोहचली नाही. ही चप्पल न्यायाधिशांच्या समोरील लाकडी दांड्याला लागून बाजूला बसलेल्या कर्मचाऱ्यार समोरच पडली. घडलेल्या घटनेची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळेंनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अरूण कोकीतकर यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात किरणविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केल्याचा ठपका ठेवत किरणवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला. 


पोलिसांविरोधात काय कारवाई करण्यात आली?


कल्याण न्यायालयाच्या आवारात घडलेल्या या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. कल्याण न्यायालयात न्यायाधीशावर एका कैदीने चप्पल भिरकावल्याच्या प्रकरणाबरोबरच अन्य एका प्रसंगी एक इसम बंदूक घेऊन कल्याण न्यायालयाच्या आवारात फिरत असल्याचं समोर आलं होतं. दोन्ही प्रकरणांमध्ये संयुक्तरित्या ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलीस मुख्यालय आणि कल्याणच्या उपायुक्तांनी 11 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.


मूळ कोणत्या प्रकरणात आरोपी अटकेत आहे?


4 वर्षापूर्वी कल्याणच्या पश्चिमेला असलेल्या मिलिंदनगरमधील सुजित पाटील नावाच्या तरूणाची हत्या करण्यात आलेली. या हत्या प्रकरणात संशयित म्हणून किरण भरम खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात आहे. सुजीत आणि किरण हे एकाच परिसरात राहायचे. त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारणावरुन वाद होता. या वादातून संशयित किरणने आपल्या साथीदारांच्या मदतीने सुजितवर कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याअंतर्गत किरण आधारवाडी कारागृहात आहे. याच प्रकरणी सुनावणी सुरु असताना चप्पल भिरकावण्याचा प्रकार घडला.