Ratanagiri Adivare Mahakali temple : कोकणात अनेक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहेत. त्यापैकीच एक आहे  रत्‍नागिरी जिल्ह्यातील 1200 वर्ष जुनी आडीवरेची महाकाली देवी. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात आडिवरे या  गावी रम्य निसर्गाच्या कोंदणात  महाकालीचे जागृत देवस्थान आहे. वर्षभर भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्‍नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावाला प्राचीन इतिहास आहे.  आडिवरेच्या या महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली, असेही सांगितले जाते. महाकालीचे मंदिर अत्यंत सुंदर असून त्याच्या चांगल्या प्रकारे निगा राखलेली आहे. देवीची मूर्ती सुबक असून तिच्या मागे दोन सुंदर मोर आहेत. 


हे देखील वाचा... अलिबाग जवळील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ तब्बल चार महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुले; इथं जाण्यासाठी होडीशिवाय पर्याय नाही


कोल्हापूरच्या अंबाबाईइतकेच महत्त्व असलेले महाकाली मंदिर हे आडिवरे गावचे भूषण आहे. हे गाव रत्‍नागिरीपासून 34 किमी आणि राजापूरपासून 28 किमी अंतरावर आहे. महाकाली ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध होत आहे.


अशी आहे मंदिराची रचना


मंदिरात महाकालीसमोर उत्तरेस महासरस्वती तर उजव्या बाजूस महालक्ष्मीची मूर्ती आहे. मंदिर परिसरातच उजव्या बाजूला योगेश्वरी, प्राकारात नगरेश्वर व रवळनाथ ही मंदिरे आहेत. देवीचे दर्शन घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे, त्यानंतर महालक्ष्मीचे, रवळनाथाचे आणि त्यानंतर महाकालीचे व महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपूर्ण परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच महाकालीचे मंदिरही कौलारू आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून महाकालीची मूर्ती अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे.


असा आहे महाकाली देवीच्या स्थापनेचा इतिहास


इसवी सन नववव्या शतकात भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले होते.  त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची प्रार्थना. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टान्त दिला. "मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर". त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची स्थापना केली अशी अख्यायिका आहे. 


जायचं कसं?


रत्‍नागिरी आणि राजापूर ही मुंबई-गोवा महामार्गावर आहेत. रेल्वेने राजापूर स्थानक गाठावे. येथून खाजगी वाहने तसेच रिक्षा मिळतात. महाराष्ट्र शासनाच्या ST बसने राजापूर बस स्थानक गाठावे. येथून खाजगी वाहने आणि रिक्षा मिळतात.