बारावीची परीक्षा उद्यापासून! भरारी पथक, मोबाईलवर चित्रीकरण आणि ... शिक्षण विभाग सज्ज
HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदा राज्यभरातून एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (12th Board Exam) उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडणार आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी (Students) नोंदणी केलेली आहे. यामध्ये 8,21,450 विद्यार्थी आणि 6,92,424 विद्यार्थीनी आहेत. एकूण 100497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3320 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे.
विज्ञान शाखा : 7,60,046
कला शाखा : 3,81,982
वाणिज्य : 3,29,905
वोकेशनल : 37,226
आय टी आय : 4750
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं
- परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक यांची नियुक्ती करणअयात आली आहे.
- परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे.
- परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
- सकाळच्या सत्रात 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी 2.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे
- प्रचलित पद्धतीते प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार असून या विषयासाठी 1,94,439 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.
ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटर यासाठी परवानगी मात्र कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठल्या ही यंत्रात नसू नये
- विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असं आव्हान शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना केलं आहे.
शिक्षण विभागाच्या सूचना
- सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोर्बाइलमध्ये करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
- प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
- सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता व दुपार सत्रात दु. 2.30 वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात स.11.00 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
- गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.
- लेखी परीक्षेपूर्वी गैरमार्ग प्रकरणी विद्यार्थ्यांसमोर शिक्षा सूचीचे तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचे वाचन करणेबाबत सर्व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत सूचित करण्यात आलेले आहे.
- परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना दिनांक 16/10/2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे. विद्यार्थ्याने कॅलक्युलेटर स्वतःचा आणावयाचा आहे. सदर कॅलक्युलेटर फक्त कॅलक्युलेटर स्वरूपातीलच असावा. मोबाईल मधील अथवा इतर इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅलक्युलेटर वापरता येणार नाही.
- संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व घटक समावेशक असा 'गैरमार्गाशी लढा' या अभियानाचा कृति कार्यक्रम या वर्षी देखील मंडळाने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्व विचारात घेवून याबाबत नियोजन करण्यात आले आहे व त्यानुसार स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थ्यांचे उद्बोधन, इ.द्वारे या अभियानाचा कृति कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
- परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच मा. विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- तसेच प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना), सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांना प्रात्यक्षिक परीक्षा काळात कमीत कमी 10 उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
- सर्व मा. विभागीय आयुक्तांना तसेच जिल्हाधिकारी यांना अर्धशासकीय पत्र पाठवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व अधिक जबाबदार भावी पिढी निर्माण व्हावी याकरीता व परीक्षा पध्दतीवरील विश्वास व आदर वृध्दींगत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या मदतीने 'गैरमार्गविरूध्द लढा' हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे.