बारावीतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट; शिक्षण उपसंचालकांचा आदेश
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे..
सागर आव्हाड, पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याच्या कारणांची खातरजमा करून मंजूर जागांच्या मर्यादेत आणि जागा उपलब्ध असल्यास त्याप्रमाणे गुणवत्तेनुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सध्याच्या घरापासून लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळू शकते असे उप संचालकांच्या आदेशात म्हटले आहे.
विविध कारणांमुळे बारावीत कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत असते. या संदर्भात 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत व जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार, बारावीसाठी महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.