आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर पोलिसांनी एका युवकाकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा युवक आंतरजिल्हा तसेच आंतरराज्यीय वाहनचोरीत सहभागी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या महागड्या दुचाकीची एकूण किंमत जवळपास सात लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील एका युवकाला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. या वाहन चोराच्या ताब्यातून पोलिसांना १४ दुचाकी मिळाल्या असून या सर्व दुचाकी चंद्रपूरसह जवळच्या यवतमाळ जिल्हा व शेजारच्या तेलंगणा-आंध्र प्रदेश या राज्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. 


गेले काही दिवस शहर व जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जाळे पसरले होते. दरम्यान कोरपना तालुक्यातील पारधी गुडा येथे राहणाऱ्या प्रदीप शेरकुरे या युवकाला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. या चोरट्याने वाहन चोरी करत त्याची विविध भागात विक्री केल्याचीही माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात लगतची राज्य व जिल्ह्यात चंद्रपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. 


एका राज्यात वाहन चोरी करून ते दुसऱ्या राज्यात विकणाऱ्या एखाद्या टोळीशी या आरोपीचा संबंध आहे का याचाही तपास चंद्रपूर पोलीस करत आहेत.