16 वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; तरुणवयातील हृदयरोग कसा टाळाल?
Heart Attack In Young Age: तरुण वयात हृदयविकाराच्या धक्क्यामुळं प्राण गमावण्याच्या प्रकरणात होत जाणारी वाढ चिंतेत टाकणारी आहे. नाशिकमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.
Heart Attack In Young Age: तरुणांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे. नाशिकमध्ये एक समस्त पालकांना चिंतेत टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 16 वर्षांच्या युवकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. तेजस विठ्ठल आहेर, असं या मुलाचे नाव असून तो दहावीच्या वर्गात शिकत होता. तेजसच्या मृत्यूमुळं परिसरातून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.
शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या लहवित गावात ही घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी तेजसचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तेजस याने अलीकडेच दहावीची परिक्षा दिली होती. त्यामुळं तो अगदी निवांत सुट्टीचा आनंद घेत होता. रविवारी तेजस घरीच असताना सर्व कुटुंबातील सदस्यांसोबत बसला होता. त्याचवेळी तो अचानक चक्कर येऊन खुर्चीवरुन खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे निदान केले.
तेजसचे वडिल हे शेतकरी आहेत. तर, मविप्र समाज संस्थेच्या जनता विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात तो शिकत होता. दहावीच्या परीक्षेसाठीही त्याने खूप मेहनत घेतली होती. आयटी इंजिनिअर होण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, त्याचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. अल्पवयातच तेजसचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. तेजसच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना एकच धक्का बसला आहे.
तरुणवयात हृदयरोगाचा झटका का?
गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. 15 वर्षांच्या तरुणांचेही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. तरुणवयात हृदयविकाराची अनेक कराणे समोर आली आहेत. आधीच्या काळात 50 वर्षांनंतर हृदयविकारांची समस्या निर्माण होत असत. मात्र, हल्ली बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम अगदी कमी वयातही जाणवत आहे. तिशीच्या आतच हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आहे.
चुकीची आहारपद्धत, बदललेली जीवनशैली, व्यायामात अनियमितता, बाहेरील खाणे, अपुरी झोप यासारख्या सवयींमुळं आरोग्याचे नुकसान होत आहे. त्यामुळंच अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. दैनदिन दिनचर्या सतत बदलल्यामुळं ताणही वाढतो. या सगळ्या सवयी हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात.
कसा बचाव कराल?
हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी आहारात बदल करा. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये यांचा आहारात समावेश करा. या आहारात पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळं हृदयरोगापासून संरक्षण होते. तेलकट, तुपकट पदार्थ खाणे टाळा. पोषक आहार घेऊन वजनावर नियंत्रण ठेवा.
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी रोज न चुकता व्यायाम करा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायम करणे खूप गरजेचे आहे. रात्री जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नका शतपावली करुनच झोपा. यामुळं अन्नाचे पचन होते. व्यायामाबरोबरच ताण-तणावमुक्त राहणेही खूप गरजेचे आहे. ध्यान आणि प्राणायमाचा समावेश करुन मानसिक आरोग्य सुधारा. अतिताण तणावामुळंही हृदयविकाराचा धोका संभवतो.