पुण्यात मोबाईलच्या वेडापायी १६ वर्षाच्या मुलाची आत्महत्या
पालकांनो मोबाईलपासून मुलांना लांबच ठेवा...
पुणे : मोबाईलच्या वेडापायी एका १६ वर्षांच्या मुलानं आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओदेखील या मुलानं जाता जाता स्वतःच्या मोबइलवर रेकॉर्ड केला. मोबाईलच्या व्यसनानं तरुणाईला विळखा घातल्याचं हे उदाहरण एकूणच परिस्थितीविषयीची चिंता वाढवणारं आहे.
एक अलवयीन मुलगा आत्महत्या करत असल्याचा हा व्हीडिओ काळजाचा थरकाप उडवणारा आहे. त्यामुळे तो स्पष्ट स्वरूपात दाखवता येणार नाही. किंबहुना तो कुणी पाहूही नये. मोबाईलच्या अतिवापरानं या मुलाचा बळी घेतला आहे. मोबाईलवर गेम्स खेळणं, व्हीडीओ बनवणं, मिम्स व्हायरल करणं याचं त्याला अक्षरशः वेड होतं. यातून त्यानं अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, शाळा सोडली, काही कामही करत नव्हता. मुलाला वळण लागावं म्हणून त्याची आजी ओरडली आणि त्यानं थेट आत्महत्येचंच पाऊल उचललं.
अशा वाढत्या घटनांमुळेच इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रांची गरज निर्माण झाली आहे. पुण्यातल्या इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रात वर्षभरात जवळपास एक हजार तरुणांनी उपचार घेतले आहेत.
मोबाईल किंवा इंटरनेटच्या व्यसनाचे मानसिक संतुलन बिघडणं, गुन्हेगारीत अडकणं, नातेसंबंध कलुषित होणं असे अनेक परिणाम आहेत. मोबाईल किंवा इंटरनेटचा आजार जडुच नये याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.