नाशिक : पोलीस दलामध्ये कोरोनाचं वाढतं प्रमाण चिंतेचा विषय बनला असताना आता नाशिकमध्ये आणखी १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच आलेल्या १२८ रिपोर्टपैकी १८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. पोलीस दलातील बधितांचा आकडा वाढत असल्यानं पोलीस दलात भीतीचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार देशात कोरोना रूग्णांची संख्या 74 हजारांच्या पुढे गेली आहे. आता एकूण रुग्णांची संख्या 74 हजार 281 झाली असून 2 हजार 415 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 24 हजार 427 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 921 लोकांचा मृत्यू झाला आहे.


आतापर्यंत एक हजाराहून अधिक पोलीस महाराष्ट्रात कोरोनाबाधित झाले आहेत. एकट्या मुंबईतच जवळपास 400 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.


कोरोनामुळे महाराष्ट्रातील 7 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात मुंबई पोलिसांचे चार, पुणे पोलिसांचा एक, सोलापूर पोलिसांचा एक आणि नाशिक ग्रामीणचा एक पोलिसाचा समावेश आहे. सध्या हजारो पोलीस क्वारंटाईन आहेत. तर 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.