1959 Gold Price Bill: सोन्याची धूर निघणारी भूमी अशी भारताची इंग्रजांच्या आक्रमणापूर्वीची ओळख होती असं सांगितलं जातं. सध्या भारतात दिवसोंदिवस सोन्याचे दर वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता लग्नसराईचे दिवस जवळ आल्याने सोन्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका अंदाजानुसार पुढील काही महिन्यांमध्ये सोन्याचे दर 60 हजार रुपये प्रति तोळ्याहून अधिक असतील. सध्या तरी आपल्यापैकी अनेकांना सोनं घेणं हे फार खर्चिक काम वाटत आहे. वर्तमानातील सोन्याच्या दरांबद्दल चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे याच सोन्याच्या दरासंदर्भातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या 50 हजारांच्या आसपास असणारा सोन्याचा दर 70 वर्षांपूर्वी किती होता तुम्हाला ठाऊक आहे का? आज म्हणजेच 13 जानेवारी 2023 ला एक तोळा सोनं 57 हजारांहून अधिक महाग असलं तरी हेच एक तोळा सोनं स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये किती स्वस्त होतं याचा अंदाज बांधता येणारी सोने खरेदीची एक पावती सध्या व्हायरल होत आहे. अगदी तुलनाच करायची झाली तर हा दर एवढा कमी होता की आताच्या एका तोळ्याच्या दरात त्यावेळी 100 ग्रामहून अधिक सोनं खरेदी करता आलं असतं.


सोशल मीडियावर एका जुन्या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो 1959 सालातील सोने खरेदीच्या पावतीचा आहे. यावेळेस सोन्याची किंमत 113 रुपये तोळे इतकी होती. 'टॅक्स गुरु डॉट इन'ने दिलेल्या माहितीनुसार 1960 साली सोन्याची किंमत प्रति तोळा 112 रुपये इतकी होती. सोने खरेदीची ही पावती नीट पाहिली तर तुम्हाला समजेल की पुण्यामधील सराफाच्या दुकानातील ही पावती आहे. पावतीच्या मथळ्यावर वामन निंबाजी अष्टेकर असं ज्वेलर्सचं नाव लिहिण्यात आलं असून हे सराफाचं दुकान रविवार पेठेत होतं असं पावतीवरील पत्त्त्यावरुन स्पष्ट होतं आहे. या पावतीवर सोने खरेदीची तारीख 3 मार्च 1959 अशी लिहिलेली आहे. विशेष म्हणजे सध्या आपल्याला प्रिंटेड खरेदी पावती म्हणेच बिल मिळत असलं तरी ही 1959 ची पावती हाताने लिहिलेली आहे. 


ज्या व्यक्तीने ही सोने खरेदी केली त्याचं नाव शिवलिंग आत्माराम असं असल्याचं पावतीवर लिहिलेल्या माहितीत दिसत आहे. या पावतीवर एकूण दोन नोंदी आहेत. यापैकी पहिली नोंद ही 62 रुपयांची असून दुसरी 12 रुपयांची नोंद ही सोनं खरेदीची आहे. या व्यक्तीने 12 रुपयांची चांदी खरेदी केली होती. हे एकूण बिल 109 रुपयांचं आहे.



हे बिल फारच जुनं असून ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अनेकांना तर सोनं एकेकाळी एवढं स्वस्त होतं यावर विश्वासच बसत नाहीय.