शेताच्या भांडणातील दोन आरोपींना कोर्टाची अनोखी शिक्षा
काही वर्षांपूर्वी औरंगाबादच्या पैठणखेडा गावात दोन गटांत भांडणं झाली. त्यावरून गुन्हाही दाखल झाला. न्यायालयात हे प्रकरण गेलं...
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी औरंगाबादच्या पैठणखेडा गावात दोन गटांत भांडणं झाली. त्यावरून गुन्हाही दाखल झाला. न्यायालयात हे प्रकरण गेलं... आणि त्याठिकाणी आरोपी दोषीही ठरले...मात्र, न्यायालयानं या आरोपींना अनोखी शिक्षा सुनावली..नेमका काय होता हा प्रकार पाहूयात...
काय आहे नेमकं प्रकरण?
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणखेडा गावची ही गोष्ट... या गावात घुले आणि घुंगार्डे यांची शेती आहे...शेताच्या मालकी हक्कातून त्यांची नेहमी भांडणं होत असत... एक दिवस तर भांडण पराकोटीला गेलं... घुंगार्डे यांनी शेतातली बोराची झाडं तोडली... त्याचा घुगे यांना प्रचंड राग आला आणि त्यातून दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली... भांडण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं... दोन्ही गटाविरोधात तक्रारीही दाखल झाल्या... कोर्टापर्यंत वाद पोहोचला...
तब्बल २ वर्षे या खटल्याचं कामकाज
तब्बल २ वर्षे या खटल्याचं कामकाज सुरू होतं...त्यात दोन्ही गट दोषी सुद्धा सिद्ध झाले... मात्र दोन्ही गटातल्या सातही आरोपींचा हा पहिलाच गुन्हा असल्यानं न्यायालयानं त्यांना शिक्षा दिली ती झाडं लावण्याची... या आरोपींना गावात येणा-या मुख्य रस्त्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला लिंबाची आणि वडाची झाडं लावण्याचं न्यायालयानं सांगितलं... घुंगार्डे यांच्या ४ आरोपींना एकाच पाच याप्रमाणं ४० झालं तर घुगे यांच्या ३ आरोपींना ३० झाडं लावण्याचे आणि त्यांचं संगोपन करण्याचेही आदेश न्यायालयानं दिलेत. तसंच पोलिसांनी या सगळ्याचा अहवाल प्रत्येक ६ महिन्याला कोर्टात सादर करण्याचेही आदेश दिलेत.
पुण्यांचं कामाने समाधान
घुगे यांनी तर तत्काळ झाडांची खड्डे खणायला सुद्धा सुरुवात केलीये... झालं ते झालं मात्र आता झाडं लावण्याचं पुण्यांचं काम करायला मिळतंय ते पार पाडणार आणि त्याची निगाही राखणार असंही ते सांगतायत.
...तर ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूदही
या प्रकरणात आता पोलिसांना आरोपींच्या चांगल्या वर्तनावर, सोबतच हे आरोपी झाडं लावून त्याची निगा राखत असल्याची काळजीही घ्यायची आहे. न्यायालयाच्या आदेशांचं पालन न केल्यास आरोपींसाठी ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूदही न्यायालयानं केलीय.
भांडणानंतर या प्रकारची शिक्षा म्हणजे दुर्लभच... मात्र भांडणात ज्या झाडांना यांनी तोडलं त्याच झाडांची सेवा करण्याची वेळ आता त्यांच्यावर आलीय... कदाचित न्यायालयाच्या माध्यमातून जणू निर्सगानंच हा न्याय केला असं दिसतंय...