Kolhapur Crime News: कोल्हापुरातील वठार येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका वीस वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित सनी अरुण कांबळे (वय वर्ष 25 राहणार वाठार) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातील वाठार येथे संशयित आरोपी सनी कांबळे या 20 वर्षीय तरुणीची ओळख करून घेत तिला वारंवार त्रास देत होता. 9 ऑक्टोबर रोजी रात्री 8 च्या सुमारास पीडिता घरी जात असताना सनी कांबळेने तिला रस्त्यात मध्येच अडवले आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे, असे म्हणत निर्जन ठिकाणी घेऊन गेला. यावेळी दोघात जोरदार वाद ही झाला होता.दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपी सनी कांबळे याने रागाच्या भरात पीडित तरुणीवर बळजबरी करत बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. 


दरम्यान, रविवारी 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एक शेतकरी वैरण आणण्यासाठी त्या भागात गेला असता त्याला युवतीचा अर्धनग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह आढळला. दरम्यान या घटनेची माहिती वडगाव पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्र असल्याने दुसऱ्यादिवशी 16 तारखेला पोलीस बंदोबस्तात मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. 


तर पोलिसांनी खुनाच्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि तपासाची चक्रे गतिमान करत संशियत आरोपी सनी कांबळे याला काही तासांतच ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. सदर संशयित हा यापूर्वी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी  वडगांव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.