पिपंरी-चिंचवडमध्ये रेमडेसिव्हीरची 21 इंजेक्शन जप्त; 3 जणांना अटक
रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरुच
पिंपरी चिंचवड : शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तीन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची 21 रेमडेसिवीची इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. कृष्ण रामराव पाटील, निखिल केशव नेहरकर, शशिकांत रघुनाथ पांचाळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी काळेवाडी फाटा इथं 9 तारखेला रात्री नाकाबंदी केली होती. त्या दरम्यान कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड आणि पोलिसांना संशय आला आणि त्यांनी चौकशी केली असता पावणे तीन वाजताच्या सुमारास आरोपी कृष्णा पाटील आणि निखिल नेहरकर यांच्या ताब्यातून दोन रेमडेसिव्हीरची इंजेक्शन मिळाली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरची इंजेक्शन हे आरोपी शशिकांत पांचाळ यांनी विक्रीसाठी दिल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी शशिकांत पांचाळ याला ताब्यात घेऊन त्याच्या गाडीची झडती घेतली असता सीटच्या खालील बाजूस 19 रेमडेसिवीरची इंजेक्शन मिळून आली.
आरोपी कृष्णा पाटील हा क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये तर आरोपी निखिल नेहरकर हा ओनेक्स हॉस्पिटल मध्ये कामाला आहे. आरोपी पांचाळ याचे आयुश्री मेडीकल नावाचे दुकान आहे. हे तीन आरोपी एमआरपी किमतीपेक्षा जादा दराने रेमडेसिव्हीर इंजेक्शन विक्री करीत होते.