तुषार तापसे, झी मीडिया,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Satara Food Poisoning: कराड (Karad) वहागाव येथे मांसाहारी जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधेमुळं (Food Poisoning) एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येत आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ माजली आहे. गावातील तब्बल २३ जणांना विषबाधा झाली असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Karad Food Poisoning News)


23 जणांना विषबाधा


मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विषबाधा झालेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला असून तुकाराम राऊत असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग त्या गावात पोहचला आहे.


देवाच्या यात्रेचं मिळालं होतं निमंत्रण


घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, वहागाव येथे ९ जून रोजी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने मांसाहारी जेवणाची देवाची यात्रा होती. गावातील व गावाबाहेरील असे एकूण 35 पै पाहुणे आणि नातेवाईकांना जेवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. शुक्रवारी सगळेजण जेवणासाठी एकत्रित जमले होते.  मांसाहारी जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 35 जणांपैकी 23 जणांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. 


उपचारादरम्यान झाला मृत्यू


उलट्यांचे प्रमाण वाढल्यानंतर तुकाराम राऊत यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर   विषबाधा झालेल्या इतर 23 जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात होते. यातील काही जणांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. तुकाराम राऊत यांच्यावर कराड येथे उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांची पत्नी सुनंदा तुकाराम राऊत यांची प्रकृती स्थिर आहे. विषबाधा झालेल्या काहींना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर, एकूण सात जणांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 


आरोग्य अधिकारी घटनास्थळी


घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, प्रमोद शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील चव्हाण व अन्य अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसंच, विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली. आरोग्य विभागाकडून मासांहारी जेवण, भाकरी, पीठ, भात व पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आल्यानंतरच नक्की काय घडलं हे कारण समोर येणार आहे. तसंच, संबंधित घरातील ५ लोकांचे स्टुव सॅम्पलदेखील आरोग्य विभागाने गोळा केले आहेत. जैविक तपासणीसाठी ते जिल्हा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.