किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरात मुलींचं बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत चाललंय. शहरातून एकवीस दिवसांत 25 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झालीय. शाळांना सुट्टी लागल्याने मुली आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण अचानक वाढल्याने पालकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक शहरातील गुन्ह्यांच्या आलेखात दिवसेंदिवस वाढच होत चाललीय. त्यात आता आणखी एका गुन्ह्याची भर पडलीय. शहरात जवळपास 21 दिवसांत 25 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झालीय. त्यामुळे पालकांसह नाशिक पोलिसांसमोर हा विषय चिंतेचा ठरतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा प्रकारच्या घटनांमुळे नाशिक पोलिसांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावं लागतंय. नाशिक पोलिसांकडून महिला सुरक्षासाठी वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र, तरिही जिल्हयातील अंबड परीसरात 7, मुंबई नाका भागात 1, भद्रकाली भागात 3, पंचवटी भागात 3, उपनगरातून 4 नाशिकरोड भागातून 2, सातपूर भागातून 1, इंदिरानगर भागातून 2, सरकारवाडा परिसरातून 1 आणि देवळाली कॅम्प परिसरातून 1 अशा एकूण 25 मुली बेपत्ता झाल्यात. बेपत्ता मुलींची ही आकडेवारी पाहून पोलीसही चक्रावून गेलेत.


उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि अचानक मुलींच्या बेपत्ता होण्यांचं प्रमाण वाढलं. मुलांच्या मानसिकतेत अचानक असा बदल घडल्याने पालक वर्गही हादरून गेलाय... तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पालक आणि मुलांमध्ये दुरावा निर्माण होतोय. याशिवाय पालक आणि मुलं यांच्यात संवादचा अभाव असल्याने असले प्रकार घडण्यास मदत होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयंत ढाके यांनी म्हटलंय.   


पालकांनो, कशी घ्याल काळजी... 


- पालकांनो मुलांशी जास्तीत जास्त संवाद ठेवा


- मुलांसोबत भांडू नका


- सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा


- मुलांमधली तणावाची लक्षणं ओळखून वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या


- कोणत्याही प्रकारचं व्यसन करुन नका


स्पर्धेच्या युगात वावरतांना अनेक पालक आपल्या मुलांपासून दूर राहतात, कधी कधीतरी कित्येक दिवस संवादही होत नसतो... आणि मग अशा प्रकारच्या घटना घडण्यास सुरुवात होते... मात्र नाशिकचा हा प्रकार जरी धक्कादायक असला तरी या घटनेवरून पालकांनी धडा घ्यायला हवा.