राज्यात २५ हजार उद्योग सुरु, ६.५ लाख कामगार परतले कामावर
राज्यातील उद्योग क्षेत्र हळहळू पूर्वपदावर येत आहे. २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.
मुंबई : राज्यातील उद्योग क्षेत्र हळहळू पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७,७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. साडेसहा लाख कामगार काम करत आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्यावतीने आयोजित बेवनारमध्ये ते बोलत होते. कोविड१९ ची महामारी आणि लॉकडाउनमधे ठप्प झालेलं उद्योग क्षेत्र पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने शासनाने रेड झोन वगळता राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने दिले आहेत. राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. साडेसहा लाख कामगार रुजू झाले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. तिथले उद्योग सुरु करण्याची मागणी होत आहे. महिना अखेरपर्यंत पूर्ण राज्य ग्रीन झोन करण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन त्यांनी केले. तसेच स्थिर वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.