रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी २६ जणांना कोरोनाची लागण
रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज २६ जण कोरोनाचे रुग्ण आढल्याने जिल्हातील कोरोनाबाधितांचा आकडा २३४ वर पोहोचला आहे. दरम्यान, लांजा तालुक्यातील दोघा भावंडाने कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५१ असून आतापर्यंत ८३ जणांची कोरोनावर मात केली आहे. आज करण्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कामथेमध्ये १२, राजापूर ४, रत्नागिरी ६ , कळंबणी ३ आणि संगमेश्वरमध्ये १ अशी नोंद करण्यात आली आहे. मुंबईतून गावी येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले असताना कोरोनाबाधितांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येण्यास मनाई केली आहे. दरम्यान, आतापर्यंत ७० हजारांच्या पुढे लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबईतून कोकणात आलेल्यांमुळे कोरोना विषाणूचा फैलावर होत असल्याचे पुढे आले आहे. गेल्या आठवड्यात १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह होता. त्यात आणखी ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर हा आकडा १८३ च्या घरात पोहोचला होता. त्यानंतर आणखी काही रुग्ण आढल्यानंतर हा आकडा १९७ च्या घरात पोहोचला होता. आता तर रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा २३४ वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.