आषाढी वारीसाठी एसटीची 3 तात्पुरती बसस्थानके
पंढरपूरहून १०० जादा बसेसची सोय
पुणे : आषाढी वारीसाठी येणा-या वारकऱ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने तीन तात्पुरती बसस्थानके उभारणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या विविध भागातून ३७८१ बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रे नंतर परतीच्या प्रवासांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया आणि अबाल वृद्धांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून एकूण जादा बसेसपैकी १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पुणे येथे आषाढी यात्रेच्या नियोजना संदर्भात परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. त्याचप्रमाणे यंदा बाजीराव विहीर येथे होणाऱ्या रिंगणसोहळ्याला भाविक-प्रवाशांना जाण्यासाठी एसटीने पंढरपूरहून १०० जादा बसेसची सोय केली आहे. तसेच यावर्षी अभिनव प्रायोग म्हणून पंढरपूर येथील ज्या ठिकाणी वारकऱ्यांचा निवास असतो. अशा ठिकाणी एसटीचे कर्मचारी स्वतः जाऊन प्रवाशांच्या मागणीनुसार आगाऊ आरक्षण करून देणार आहेत.