Crime News: नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ठिकाठिकाणच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांपासून ते अगदी सोसायट्यांमध्येही सरत्या वर्षाला निरोप देत 2025 चं दणक्यात स्वागत करताना कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्वांनीच पुरेपूर काळजी घेतली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल झाल्याचं मागील काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं. तर दुसरीकडे जवळपास सर्वच शहरांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशातच काही बाचाबाचीचे आणि मारहाणीचे प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. 


कुडाळमध्ये नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्गमधील कुडाळ बाजारपेठेत पर्यटकांनी स्थानिकाशी हुज्जत घालत काहींना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईवरुन पर्यटनासाठी आलेल्या एका इनोवा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिली. यावरुन झालेल्या वादावादीमध्ये कुडाळमधील व्यावसायिक आप्पा गडेकर यांच्याशी इनोवा कारमधल्या मुंबईकर महिला पर्यटकांनी हुज्जत घालत बेदम मारहाण केली. पर्यटकांनी कुडाळमध्ये धिंगाणा घातला. हे प्रकरण रस्त्यावरुन थेट पोलीस ठाण्यात गेले.


पोलीस स्टेशनबाहेर गर्दी


राजकीय पदाचा वापर करून पर्यटक महिला पोलिसांवर दबाव टाकत असल्याच्या संशयावरून स्थानिकांनी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. कविलकाटे गावातील नागरिकांनी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणा गर्दी केल्याचं दिसून आलं. पोलिसांकडून या प्रकरणामध्ये परस्परविरोधी तक्रारी नोंदवून घेण्यात आल्या आहेत. हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. मात्र पर्यटकांनी स्थानिकाला मारहाण का केली असा प्रश्न स्थानिक गावकऱ्यांकडून विचारण्यात आला. 


कारमधून बाहेर काढून तरुणाला मारहाण


दुसरीकडे डोंबिवलीमधील उसाटने गावामध्येही एक विचित्र प्रकार घडला आहे. भररस्त्यात कारमधून एका तरुणाला बाहेर काढून बेदम मारहाण करण्यात आली. या तरुणाचं नाव आदित्य मढवी असं असून त्याच्या कारची तोडफोड करण्यात आली. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. एका कुटुंबियाला तुमच्या मुलीला उचलून नेणार अशी धमकी मारहाण करणाऱ्या तरुणाने दिली होती. या प्रकरणामध्ये आदित्यने मध्यस्थी केली होती. या रागातून आज आदित्यवर हल्ला करण्यात आला. आदित्य गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणामध्ये डोंबिवलीमधील मानपाडा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


'दारू सोडा, दूध प्या'


नववर्षाच्या स्वागतादरम्यान अनेक जण मद्यपान करून बेभानपणे गाडी चालवतात, याशिवाय अनेकदा चालकाने मद्यपान केलेल्या अवस्थेत गाडी चालवल्याने अपघाताचे घटना घडतात. याबाबत जनजागृती करता नागपुरमध्ये रोड मार्क फाउंडेशन तर्फे 'दारू सोडा, दूध प्या' हा अनोखा उपक्रम नववर्षाच्या पूर्वसंध्येला राबवण्यात आला.