रत्नागिरीत सव्वा चार किलो गांजा - ब्राऊन शुगर जप्त
पोलिसांनी गांजा तस्करी विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडली असून रत्नागिरी शहरात एकूण सव्वा चार किलो गांजा जप्त करण्यात आला.
रत्नागिरी : पोलिसांनी गांजा तस्करी विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडली असून रत्नागिरी शहरात शनिवारी ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अडीचशे ग्रॅम गांजा आणि ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत एकूण सव्वा चार किलो गांजा जप्त करण्यात आला.
आतापर्यंत या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. निवारी थिबा पॅलेस परिसरात पोलिसांकडून धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत अडीचशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून आकाश तथा सलमान अशोक डांगे याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर अश्रफ शेख तथा अद्र्या याच्याकडून ब्राऊन शुगर देखील जप्त करण्यात आली आहे. त्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या तीन दिवसात पोलिसांनी सापळा रचून सव्वाचार किलो गांजा जप्त केला आहे. गांजा तस्करांविरोधात पोलिसांनी व्यापक मोहीम उघडल्याने जनमानसातून समाधान व्यक्त केले जात आहे.