मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : राज्यात कांदा उत्पादकांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. धान उत्पादकही संकटात सापडला आहे. 512 पोती कांदा विकून एका शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले आहेत. अधिवेशनात देखील गदारोळ माजला. शेतकऱ्यांच्या अडचणी काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. बुलढाणा येथे कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  नुकसान भरपाई न मिळाल्यास  टोकाचे पाऊल उचलण्याची भूमिका या शेतकऱ्याने जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अर्थातच पोखरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र, लालफितीच्या कारभारात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या फाइल्स टेबलाखालून काही मिळाल्याशिवाय समोर ढकलल्या जात नाहीत, परिणामी याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातल्या बायगाव येथील शेतकऱ्या सोबत घडला आहे. 


या शेतकऱ्याचे तब्बल चार लाख रुपये आता अडकून पडले आहेत. एक प्रकारे नुकसानच झालं आहे हे म्हणायला हरकत नाही. बायगाव येथील कृषी सहाय्यक शिवाजी शिंगणे यांनी पोखरा योजनेअंतर्गत लागवड करण्यात येणाऱ्या फळबागेची पूर्वसंमती वेळेत न दिल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचा मोठा नुकसान झाले.  शेतकरी प्रसाद नागरे यांनी याबाबत कृषी अधीक्षकांकडे तक्रार देखील केली आहे. 


यासंदर्भात आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक यांना विचारले असता त्यांनीदेखील या कृषी सहाय्यक बद्दल अनेक तक्रारी आल्याचं मान्य केलं शिवाय चौकशी करून या संदर्भात कारवाई करण्याचे देखील आश्वासन दिल असल्याचे तक्रारदार शेतकऱ्याने सांगितले.


कांद्याला भाव मिळेना, शेतकऱ्याने फिरवला नांगर


कांदा आणि वांगी या पिकांचे भाव ढासळल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने आपल्या शेतातील तीन एकर वर असलेल्या उभ्या पिकांवर नांगर फिरवला आहे. कांदा हा शेतकऱ्यांसाठी नगदी पैसे देणार पिक आहे. यासोबतच उन्हाळ्यामध्ये वांग्याला देखील चांगला भाव मिळतो त्यामुळे थोडसं पाण्याच नियोजन असलेले शेतकरी आपल्या थोड्याफार शेतीवर कांदा वांगी या पिकाची लागवड करतात. यावर्षी कांदा आणि वांगी या दोन्ही पिकांची बाजारात अत्यंत दुरावस्था झाली आहे. घाऊक बाजारात कांदकांदा एक-दोन रुपये किलोवर तर वांगी चार ते पाच रुपये किलो विकले जात असल्याने मशागतीचा आणि पिकावर झालेला खर्च देखील वसूल होत नाहीय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरल आहे. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील गंगाधर गाडेकर यांनी दोन एकर कांदा आणि एक एकर वांग्याचे पीक घेतलं आहे. दोन्ही पीक अत्यंत चांगली आलेली असताना बाजारात भाव मिळत नसल्याने त्यांनी पिकामध्ये नांगर फिरवला आणि मेंढ्यांना चारण्यासाठी मेंढ पाळांना परवानगी दिली आहे.