New Vande Bharat Express Trains From Pune: भारतीय रेल्वेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेन्सला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भारतातील 45 मार्गांवर एकूण 51 वंदे भारत ट्रेन्स धावतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च महिन्यामध्येच नव्याने 10 वंदे भारत ट्रेन्सच्या मार्गांचं उद्घाटन केलं. यामध्ये महाराष्ट्रातून मुंबई-अहमदाबाद मार्गावरही वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली आहे. आधीपासूनच महाराष्ट्रामध्येही अनेक मार्गांवर वंदेभारत ट्रेन धावतात. मुख्यत्वे मुंबईशी संलग्न मार्गांवर आतापर्यंत सुरुवातीच्या टप्प्यात वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. मात्र लवकरच पुण्याला वंदे भारत ट्रेन्सची मोठी भेट मिळणार आहे.


एकच ट्रेन पुण्यातून जाते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात धावणाऱ्या एकूण 8 मार्गांवरील केवळ एक मार्ग पुण्यातून जातो. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूरदरम्यान धावणारी वंदे भारत पुणे मार्गे जाते. ही एकमेव वंदे भारत ट्रेन सधया पुणेकरांना वापरता येते. सध्या तरी पुण्यातून म्हणजेच पुणे स्थानकामधून कोणतीही वंदे भारत ट्रेन धावत नाही. मात्र आता लवकरच पुण्याला काही नवीन ट्रेन्सबरोबर वंदे भारत ट्रेनच्या दुरुस्तीचं केंद्रही मिळणार आहे. नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पुण्याला 4 नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची दाट शक्यता आहे. 


पुण्यातून या 4 मार्गांवर सुटणार वंदे भारत?


पुण्यातून ज्या मार्गांवर वंदे भारत सुरु होणार आहेत त्या मार्गांमध्ये पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या 4 मार्गांचा समावेश आहे. या 4 ही वंदे भारत गाड्या या वर्षाच्या शेवटापर्यंत म्हणजेच डिसेंबर 2024 अखेरपर्यंत किंवा आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी म्हणजेच मार्च 2025 अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता वेगवेगळ्या मिडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आली आहे. 


वंदे भारतसाठी विशेष वर्कशॉप


पुण्यातील घोरपडी येथे वंदे भारतचे डब्बे दुरुस्त करण्याचं वर्कशॉप सुरु केलं जाणार आहे. यासंदर्भातील निविदा लवकरच काढल्या जाणार आहेत. काम सुरु झाल्यानंतर वर्षभरामध्ये हे काम पूर्ण केलं जाईल. वंदे भारत ट्रेनच्या दुरुस्तीचं वर्कशॉप घोरपडीमध्ये सुरु होणार असल्याचे संकेत पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी दिल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलं आहे. "पुणे-सिकंदराबाद, पुणे-बडोदा मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे बोर्डाने मार्गांसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुढील काही महिन्यांमध्ये लगेच इथून वंदे भारत ट्रेन सुरु होण्याची शक्यता नगण्या आहे. वंदे भारत ट्रेनसाठी कोच डोपोची आवश्यकता आहे. यासाठीच्या निवदा काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल," असं दुबे म्हणाले. हे वर्कशॉप बांधण्यासाठी एकूण 89 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.


महाराष्ट्रात या 8 मार्गांवर सध्या धावते वंदे भारत


महाराष्ट्रात एकूण 8 मार्गावर वंदे भारत ट्रेन धावतात. मुंबई-अमदाबाद ही महाराष्ट्रातील 8 वी वंदे भारत ट्रेन ठरली आहे. यापूर्वीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावतात.