अहमदनगरः एटीएम फोडण्यासाठी गेले मात्र चोरांचीच झाली फसगत; Video पाहाच
Ahmednagar News Today: चोर एटीएम फोडण्यासाठी गेले. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांचीच फसगत झाली. अहमदनगरमध्ये काय घडलं जाणून घ्या.
Ahmednagar News Today: निर्जन ठिकाणी असलेले एटीएम फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहेत. बँकाच्या एटीएमबाहेर सुरक्षा रक्षक नसेल असे एटीएम हेरुन त्यातील रक्कम चोरायची असा चोरांचा साधा सरळ फंडा झाला आहे. पण कधीकधी यातही चोरांचीच फसगत होते. असाच एक प्रकार अहमदनगरच्या खडकी गावात झाला आहे.
अहमदनगर शहराजवळ असलेल्या खडकी या गावात हा प्रकार घडला आहे. एटीएम फोडण्यासाठी पूर्ण तयारी करून आलेल्या चोरांचा डाव लाईट गेल्यामुळे फसला आहे. चोरांनी सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठीही मोठी खबरदारी घेतली होती. मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
9 डिसेंबरच्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार चोरटे नगर शहराजवळच असलेल्या खडकी येथील खाजगी कंपनीचे एटीएम फोडण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आले होते. सुरुवातीला त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावर काळा स्प्रेमारून आपण कोणाला दिसणार नाही याची खबरदारी घेतली. त्यानंतर कटरच्या सहाय्याने एटीएम तोडण्याचा प्रयत्न केला मात्र लाईट गेल्यामुळे त्यांचा डाव फसला आणि त्यांना एटीएममधील रक्कम न घेताच काढता पाय घ्यावा लागला.
सकाळी कर्मचारी आल्यानंतर त्यांना एटीएमची अवस्था पाहून शंका आली. त्यानंतर लगेचच सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खात्री पडली. एटीएम चालकाने नगर तालुका पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस प्राप्त सीसीटीव्हीच्या आधारे चार चोरट्यांचा शोध घेत आहे.
मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलणाऱ्या आरोपींना अटक
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम सेंटरमध्ये एटीएम कार्डची देवाणघेवाण करणाऱ्या दोन आरोपींना मुंबईतील कुरार पोलिसांनी अटक केली आहे. नागरिक गेल्यानंतर ते त्यांच्या एटीएम कार्डमधून पैसे काढायचे. या आरोपींनी मदतीच्या बहाण्याने मुंबई, ठाणे, मीरा रोड, वसई विरारसह अनेक भागात लोकांची फसवणूक केली आहे. दोन घटना कुरार पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत, मात्र एकूण 16 घटना या आरोपींनी केल्या आहेत. आरोपींकडून 117 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. प्रद्युम राधेश्याम यादव उर्फ पप्पी असे आरोपीचे नाव असून विवेक मृदुल पांडे उर्फ विकी असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.