हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : पाच वर्षापूर्वीच्या त्या मन सुन्न करणाऱ्या पहाटेची आजही आठवण काढली की अंगावरती शहारे उभे राहतात. पाच वर्षापूर्वी काही क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं होतं ते पुणे जिल्ह्यातील माळीण गाव. माळीण हे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. यामध्ये तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 900 पेक्षा जास्त मुक्या जणावरांचाही यात मृत्यू झाला होता. आज या दुर्दैवी घटनेला पाच वर्षे पूर्ण झाले असून, आज या माळीण गावात पाचवा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला. या आठवणी नातेवाईकांच्या डोळ्यात अजूनही ताज्या आहेत. आज पाच वर्षानंतर माळीणकरांना श्रद्धांजली वाहिन्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 जुलै 2014 रोजी पाच वर्षापूर्वी याच माळीण गावावर ती पहाट काळाचा डोंगरच ठरली. काहीच क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्याची आजही भीती या माळीण वासियांच्या मनात घर करुन बसली आहे. या दुर्घटनेत कोणी आई गमवली, कोणी वडील, कोणी भाऊ-बहीण तर कोणी मुले. 


ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली तो संपूर्ण परिसर निर्मनुष्य झालेला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं कौलारू घरांचे माळीण आता भकास झालेले दिसते. जिल्हा परिषदेची बंद पडलेली शाळा, अर्धवट पडलेल्या अवस्थेत असलेली घरे आणि सभोवताली गवत वाढलेला निर्मनुष्य परिसर एवढेच काय, ते माळीणचे अवशेष उरले आहेत. शासनाने या ठिकाणी स्मृतिस्तंभ तयार केला आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींची नावे यावर लिहिण्यात आली आहे. तसेच त्यांच्या नावाने एक झाड देखील लावण्यात आले आहे.


आजही येथील लोकांच्या मनात या दुर्घटनेमुळे भीती आहे. राज्यातच नाही तर संपूर्ण देशात या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त होत होती.