महिलांना गाळे लिलावात ५० टक्के आरक्षण, कळंब नगरपालिकेचा ऐतिहासिक निर्णय
महिलांना 50% आरक्षण देण्याचा ठराव सोमवारी सर्वानुमते मंजूर केला आहे.
मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नगरपालिकेने गाळे लिलावात महिलांना 50% आरक्षण देण्याचा ठराव सोमवारी सर्वानुमते मंजूर केला आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होत आहे. कळंब नगरपालिकेच्या आरक्षण क्र. 32 आणि 33 मधील जुन्या बस स्थानकावरील गाळे केंद्राच्या लिलावा संदर्भात आज दिनांक 10 जून रोजी पालीकेची विशेष सभा आयोजित केली होती. या शॉपींग सेंटरच्या दुकानात शासन आदेशानुसार फक्त अपंग आणि अनुसुचीत जातीसाठी असलेले आरक्षण प्रस्तावित होते.
नगरपालिका निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देऊन सत्तेत वाटा दिला. पण आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी गाळ्यात आरक्षण देऊन आपण आणखी एक पाऊल टाकू शकतो. एखाद्या महिलेला आर्थिक स्वयंपूर्णता मिळण्यासाठी किंवा कधी एकटं पडण्याचा प्रसंग आला तर आधार व्हावे. म्हणून हा निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव कळंब नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सभागृहात मांडला.
महिलांच्या हिताचा हा प्रस्ताव मुख्यधिकारी विशाल भोसले, नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे तसेच विरोधी पक्षाचे गटनेता शिवाजी कापसे आणि इतर नगरसेवकांनी एकमताने मंजूर केला. महिलांना आर्थिक पाठबळ मिळावा यासाठी राज्य सरकारने राज्यभर हे पॅटर्न राबवावे असे आवाहन उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी केले. कळंब नगरपालिकेच्या या निर्णयाचे जिल्हाभर स्वागत होत आहे.