निलेश वाघ, झी मिडिया, कळवण : शेतकऱ्याच्या कांद्याला यंदा चांगला दर मिळत असल्याने ऑटोमोबाईल्स क्षेत्रात मंदी असतानाही नाशिक जिल्ह्यातील  कळवणच्या  विविध ट्रॅक्टर शोरूममधून  गणेशोत्सव,नवरात्र आणि दसऱ्यापर्यंत 407 ट्रॅक्टरची विक्री झाली. तर आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत 100 ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी खरेदी केले. आतापर्यंत सुमारे 50 कोटी रुपयांची उलाढाल ट्रॅक्टर विक्रीतून झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यातच कळवण, देवळा ,सटाणा आणि मालेगाव परिसर उन्हाळी कांद्याचे उत्पन्न घेण्यात अग्रेसर मानला जातो. चार वर्षांपासून चाळीत साठवून  ठेवलेल्या कांदा 1000 ते 500 रुपये तर कधी मातीमोल किमंतीत विकावा लागल्याने शेतकरी आर्थिक संकाटात  होता. 



यंदा मात्र  उन्हाळ कांद्याला उच्चाकी दर मिळाला उन्हाळ कांदा 2 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत विकला गेला.त्याच बरोबर कोबीला चांगला दर मिळाल्याने शेतकरी सुखावला. दोन पैसे  शेतकऱ्याच्या हातात खेळू लागतात  शेतीसाठी उपयुक्त असलेला ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी साहित्य खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल पहायाला  मिळाला. 


गणेशोत्सवापासून ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर सेंटरकडे पाऊले वळू लागली. नंतर नवरात्र आणि दसऱ्याचा  मुहूर्त साधत शेतकऱयांनी  एकट्या कळवणच्या विविध सेंटर मधून 407 ट्रॅक्टर खरेदी केले. तर आज दिवाळी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत 100 वर ट्रॅक्टर खरेदी झाले. 


आज दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवेकोर खरेदी केलेले ट्रॅक्टर कळवणच्या रस्त्यावर फिरतांना दिसत होते. ट्रॅक्टर बरोबरच त्यासाठी पुरक असलेल्या ट्रॉली, नांगर, रोटावेटर तसेच शेती पुरक साहित्य शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने या क्षेत्रातून आतापर्यंत 50 कोटी रूपायांवर उलाढाल पाहायला मिळाली.