कल्याण-डोंबिवलीत ६ महिन्याच्या बाळाला कोरोना, रुग्णांची संख्या २४ वर
नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज कल्याण-डोंबिवलीत ३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या ३ रुग्णांमध्ये एका ६ महिन्याच्या चिमुरड्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. तसेच ६० वर्षीय आजीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज २४ वर पोहचली आहे.
आज आढळलेल्या कोरोना रूग्णांमध्ये ४१ वर्षाचा रुग्ण आहे. हा रुग्ण डोंबिवली पश्चिम, गरीबाचा वाडा या भागातील असून इतर २ रुग्ण हे कल्याण पश्चिमेच्या चिकणघर परिसरात नुकत्याच सापडलेल्या कोरोनाबाधिताचे सहवासात आलेले आहेत. 60 वर्षीय महिलेसह 6 महिन्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
डोंबिवली शहरातील एक ६० वर्षाची महिला बरी झाली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
लोकांनी मात्र अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घराबाहेर न पडण्याचं आवाहन सतत प्रशासनाकडून करण्यात येत आहे.