चंद्रशेखर भूयार / मुरबाड : Murbad Barvi Rehabilitation : बारवी धरणातील (Barvi Dam) 627 प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार या नोकऱ्या मिळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत एमआयडीसीने महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रमुखांना पत्रे पाठवली आहेत. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणातून बाधितांना नोकऱ्या देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


बदलापूरच्या बारवी धरणाची उंची 2018 साली 4 मीटरने वाढवण्यात आली. यावेळी धरणाचं पाणलोट क्षेत्र वाढल्यानं 1203 कुटुंब विस्थापित झाली. या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासोबतच प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याबाबतचा जीआर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने 18 सप्टेंबर 2017 रोजी काढला होता. 


याच जीआरच्या अनुषंगाने बारवी धरणाची मालकी असलेल्या एमआयडीसीने 209 बाधितांना स्वतःकडे नोकरी दिली. तर उर्वरित 418 जणांना नोकरी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका आणि नगरपालिकांना एमआयडीसीने पत्रं पाठवली आहेत. 


त्यानुसार ठाणे महानगरपालिकेत 29, नवी मुंबई महानगरपालिकेत 68, मीरा भाईंदर महानगरपालिकेत 97, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाधिक 121, उल्हासनगर महानगरपालिकेत 34, अंबरनाथ नगरपरिषदेत 16, बदलापूर नगरपरिषदेत 18 आणि एमआयडीसीत 35 जणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. 


यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बारवी प्रकल्पग्रस्तांसाठी विहित केलेलं पाच टक्के आणि भूकंपग्रस्तांसाठी विहित करण्यात आलेलं दोन टक्के असं एकूण सात टक्के आरक्षण वापरण्यात येणार आहे, अशी माहिती मुरबाड विधानसभा सदस्य किसन कथोरे यांनी दिली.