Jalgaon Banana : जळगावातच केळी मिळेनात; केळ्यांना 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव
जळगावची केळी जग प्रसिद्ध आहेत. मात्र, आता जळगावकरांना केळीच (Jalgaon Banana) मिळेनाशी झाली आहेत.
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : केळीच्या उत्पादनात (Banana Production) भारत अव्वल क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा केळी उत्पादनासठी प्रसिद्ध आहे. मात्र, याच जळगावात केळी मिळेनाशी झाली आहेत. यामुळेच जळगावमध्ये 70 रुपये डझन (70 Rs per dozen) इतक्या विक्रमी दराने केळी विकली जात आहेत.
केळींसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावातच सध्या केळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जळगावमध्ये 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव देऊनही सर्वसामान्यांना केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हयातील 80 हजार हेक्टर पैकी पंधरा ते वीस हजार हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागांवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे केळीचे उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने केळींचे दर देखील वाढले आहेत. केळी पिकासाठी राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात आज सर्व सामान्य जनतेला केळी मिळणे दुरापास्त झाले आहे.
देशभरात केळीची आवक घटली
देशभरात केळीची आवक घटली असतानाच आखाती देशांत केळीची मागणी जोमात आहे. पण, देशात निर्यातक्षम केळीचा मोठा तुटवडा असल्याने केळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशात निर्यातीच्या केळीला प्रतिक्विंटल विक्रमी तीन हजार रुपयांपर्यंत दर आहे. तर जळगावातील केळीला 2 हजार पेक्षा अधिक भाव मिळत आहे.
आखातातील इराण, इराक, बहरीन, सौदी अरेबिया आदी भागांत निर्यातीसाठी देशात रोज 500 कंटेनर केळीची मागणी आहे. परंतु सध्या रोज फक्त 65 ते 70 कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) निर्यातक्षम केळी देशात उपलब्ध होत आहे. अनेक वर्षांनंतर डिसेंबर व जानेवारीत 3 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीला मिळत आहे.
उत्तर भारतात केळीला कमी उठाव आहे. परंतु परदेशात मोठी मागणी आहे. ही मागणी देशातील केळी उत्पादक पूर्ण करू शकत नाहीत अशी स्थिती आहे. गारपीट, सिएमव्ही मुळे मोठ्या प्रमाणावर केळी पिकाची आवक घटल्याने देखील तुटवडा निर्माण झाला असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.