छत्रपती संभाजीनगर एका 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्येने हादरलं आहे. निराला बाजार परिसरात हा मृतदेह आढळला आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शारदाश्रम कॉलनीत वृद्ध महिलेची हत्या झाल्याची बातमी पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अलका तळणीकर असं या महिलेचं नाव आहे. महिलेचा मृतदेह राहत्या घऱातच आढळला. महिलेला खुर्चीवर बांधून ठेवण्यात आलं होतं. अत्यंत क्रूर पद्धतीन झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय अलका तळणीकर शारदाश्रम कॉलनीत वास्तव्यास होत्या. आपल्या घऱात त्या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या भाच्याने बुधवारी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण वारंवार फोन करुनही त्या काहीच प्रतिसाद देत नव्हत्या. यानंतर त्यांनी इमारतीत राहणाऱ्या भाडेकरुंना घऱी जाऊन पाहण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी जाऊन पाहिलं असता धक्काच बसला. कारण खुर्चीवर बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह होता. त्यांच्या तोंड आणि पायाला चिकटपट्टी बांधण्यात आली होती. तर हात मागे कपड्याने बांधले होते. 


अलका तळणीकर यांचा मुलगा लातूरमध्ये वास्तव्यात आहे. तर एक भाऊ विदेशात असतो. त्यांच्या बहिणीचा मुलगा मुंबईला गेला होता. त्यानेच फोन करुन अलका तळणीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. अलका तळणीकर राहत असलेल्या ठिकाणी पहिल्या मजल्यावरील गाळे भाड्याने देण्यात आले होते. 


अलका तळणीकर यांची हत्या झाल्याचं कळताच परिसरात खळबळ उडाली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक  नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक प्रभाकर सोनावणे घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस वेगाने तपास करत आहेत. याप्रकरणी 4 ते 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.