पवारांना भरसभेत ९० वर्षांचे आजोबा म्हणाले, `साहेब आता यांना मुख्यमंत्री करा`
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी बीड जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते
लक्ष्मीकांत रूईकर, झी मीडिया, बीड : स्थळ क्षीरसागर यांचा नवगण राजुरी येथील मळा, दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हजर, समोर हजारो शेतकरी अन त्यातीलच एक नव्वद वर्षीय आजोबा उठतात, माईकचा ताबा घेतात, ''अन साहेब आमच्या धनुभाऊला मुख्यमंत्री करा म्हणतात''.....अचानक घडलेल्या या प्रसंगाने उपस्थित सर्वाचेच डोळे विस्फारतात, अन शरद पवार देखील तेवढ्याच मिश्कीलपणे धनंजय मुंडेंकडे पाहून स्मितहास्य करीत धनंजयला मुख्यमंत्री करून टाकू म्हणतात, तेव्हा उपस्थितात एकच हशा पिकतो .
हा प्रसंग घडला शरद पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात, त्याचे झाले असे की, ""साहेब दुष्काळ गंभीर आहे पण त्या मुंबईत बसलेल्या देवबाप्पाला काहीच कळत नाही, देशाचा पंतप्रधान सुद्धा बारामतीत येऊन तुमचे सल्ला घेतो, तवा त्या देवबाप्पाला काहीतरी सांगा, नाहीतर शेतकऱ्यासाठी झटणाऱ्या आमच्या धनुभवला मुख्यमंत्री करा", असे उद्गार एका वृद्ध व्यक्तीने शरद पवारांच्या समोर काढले अन पवारांनी देखील धनंजय मुंडेकडे पहात," हसत हसत करून टाकू" असं म्हटलं .
एकीकडे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हटलं जात असताना क्षीरसागर यांच्या राजुरीत धनंजय मुंडे यांना जनतेनेच मुख्यमंत्री करा अशी मागणी पवारांकडे केल्याने आणि पवारांनी देखील त्याला होकार दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी बीड जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते तेव्हा संदीप क्षीरसागर यांच्या आग्रहावरून ते नवगणराजुरी येथील चारा छावणीला भेट दिली.
यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना 90 वर्षीय वृद्ध आजोबा उठले आणि त्यांनी माईकचा ताबा घेतला, आणि म्हणाले, "पवार साहेब तुम्ही आमचे मायबाप आहात, काकू नाना असताना आम्हाला काही कमी पडलं नाही, मात्र आता कारखाना बंद झाला, दुष्काळामुळे प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता मुंबईला जा, अंत्या देवबाप्पाला सांगा दुष्काळ दूर कर म्हणून, अन त्याला जमत नसेल तर शेतकऱ्यासाठी झटणाऱ्या आमच्या धनुला मुख्यमंत्री करा".
असं वक्तव्य त्या वृद्ध आजोबांनी करतात सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांचं समर्थन केलं, तर शरद पवार यांनी धनंजय मुंडे पहा स्मितहास्य करत, "धनंजयला करून टाकू मुख्यमंत्री", असं म्हटलं.
एकीकडे धनंजय मुंडे यांच्या बहीण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हटलं जात असताना, क्षीरसागर यांच्या राजुरी गावात, धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी पुढे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, दस्तुरखुद्द शरद पवार यांनीदेखील हा प्रसंग आणि त्याचे गांभीर्य ओळखला.
पवारांनी त्या वृद्ध आजोबांच्या भावना समजून घेतल्या, धनंजय मुंडे यांना निश्चितपणे राष्ट्रवादीत भविष्य आहे, हेच पवारांच्या स्मितहास्यावरून दिसून आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.