मुंबई : 2019 या वर्षात विदर्भातील सहा जिल्ह्यांमधून 1 ते 35 वयोगटातील 926 मुली बेपत्ता झाल्या. अकोल्यात 15 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर या दोन महिन्यात तब्बल 35 मुली बेपत्ता झाल्या आहेत. यात तपास होत नसल्यानं एका बेपत्ता मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने थेट अकोला जिल्हा पोलीस अधिक्षकांना दोनदा न्यायालयात हजर होण्याचे फर्मान सोडलं. मात्र, त्यानंतर तक्रारदार पालकांचीच पोलिसांनी छळवणूक चालवल्याचा आरोप बेपत्ता मुलीच्या वडिलांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात तक्रारदार वडिलांनी आपली कैफीयत थेट मुंबईत गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मांडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल गावकर यांची तडकाफडकी बदली केली. तर दोन तपास अधिकारी भानूप्रताप मडावी आणि प्रणिता कऱ्हाळे यांना तपासातील असंवेदनशीलपणा आणि दिरंगाईमुळे निलंबित केले. या रोखठोक कारवाईनं अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.