विकास भदाणे, जळगाव : राष्ट्रीयकृत बँकेचे सभासद, मृत तसेच परगावी राहणाऱ्या सभासदांचे बोगस कागदपत्रे बनवून त्यांच्या नावे ९५ लाखांचे बनावट कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील डांगरी गावातील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये घडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि लिपिक यांच्या  संगनमताने हा अपहार घडल्याचा आरोप आहे. बदनामी करण्याच्या हेतूने आरोप केला जात असल्याचा दावा मात्र सोसायटी अध्यक्षांनी केलाय. 


गावपातळीवर शेतकऱ्यांना खरीपाचं पीककर्ज तसंच मध्यम मुदतीचं कर्जवाटप करण्यासाठी जिल्हा बँकेच्या विविध कार्यकारी सोसायट्या कार्यरत आहेत. मात्र काही सोसायट्या देखील आता गैरव्यवहाराचा अड्डा बनल्या आहेत.


मृत तसेच बाहेरगावी राहणाऱ्या शेतकरी सभासदांच्या नावाने बोगस कागदपत्र तयार करून अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी सोसायटीत ९५ लाखांचा अपहार करण्यात आलाय. अध्यक्ष अनिल शिसोदे, सचिव मोहन पवार आणि लिपिक कमलाकर शिसोदे यांच्यावर हे गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आलेय. 


दरम्यान, ज्यांच्यावर हा अपहाराचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी मात्र याबाबत बचावात्मक पवित्रा घेतलाय. झालेल्या गैरव्यवहाराला सचिवच जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण सोसायटीच्या अध्यक्षांनी दिले आहे.


शेतकऱ्यांच्या आरोपानंतर आता डांगरी सोसायटीत झालेल्या या लाखो रुपयांच्या अपहाराच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आलीय. समितीच्या अहवालानंतर कोणाकोणावर कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.