बाभळीच्या काट्यांच्या ढिगार्यात भक्तांचे लोटांगण; 300 वर्षांची परंपरा असलेल्या काटेबारस यात्रेचा थरार
अगदी पाण्यात सूर मारावा तस काट्यांचा ढिगार्यात सूर मारून मुक्तपणे लोळण घेणाऱ्या भक्तांना पाहून अंगावर काटा येतो.
निलेश खरमरे, झी मिडिया, पुणे : दिवाळी(Diwali) नंतर राज्यभरात गावागातील देव देवतांच्या यात्रांना सुरुवात झाली आहे. पुरंदरमधील गुळूंचे येथील यात्रेला तब्बल 300 वर्षांची परंपरा आहे. काटेबारस नावाने प्रसिद्ध असलेल्या या पारंपारिक यात्रेत भक्त थेट बाभळीच्या काट्यांच्या ढिगार्यात लोटांगण घालतात. यात्रेतील हा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी होते (purandar gulunche kate baras yatra).
पुण्यातील पुरंदर येथील गुळुंचे गावात काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रेला 300 वर्षांचा इतिहास आहे. यात्रेत सहभागी होणारे भक्त बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेतात.
यंदा हजारो भाविकांनी हा काटेबारस यात्रेचा थरार अनुभवला. तीनशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून ही परंपरा चालत आली आहे.
"हर बोले हर हर महादेव" चा गजर आणि देवाच्या भेटीच्या ओढीने भक्त बाभळीच्या काट्यांच्या ढिगार्यात उड्या घेतात. अगदी पाण्यात सूर मारावा तस काट्यांचा ढिगार्यात सूर मारून मुक्तपणे लोळण घेणाऱ्या भक्तांना पाहून अंगावर काटा येतो.
अशी आहे या काटेबारस यात्रेची अख्यायीका
भगवान शंकर म्हणजेच ज्योतिर्लिंग देव आणि त्यांची बहीण यांच्यात वाद झाला. यानंतर बहीण रुसून निघून गेली. देव तिला आणायला गेले. पण बहीण यायला तयार नव्हती.
पश्चाताप म्हणून ज्योतिर्लिंग देवाने काट्यांच्या ढीगामध्ये स्वतःला उघड्या अंगाने झोकून दिले. देवाची ही अवस्था पाहून बहिणीला त्यांची दया आली. यानंतर बहीण भावा बरोबर घरी आली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली अशी आख्यायिका सांगितले जाते.
काटे टोचत नाहीत
या ढिगात उड्या मारल्याने अंगात फारसे काटे टोचत नाहीत. जर काटे टोचलेच तरी त्यापासून मोठी जखम कधीही झाली नाही असे काट्यांमध्ये उघड्या घेणारे भक्तगण सांगतात.