Devendra Fadnavis : आधी मुंबईतला सागर बंगला... आणि आता नागपुरातला देवगिरी बंगला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांची रीघ लागलीय. कुणाला लोकसभेचे तिकीट हवंय, तर कुणी तिकीट मिळालं नाही म्हणून रुसलंय. कुणी महायुतीच्या उमेदवारालाच विरोध केलाय, तर कुणी अधिकृत उमेदवाराविरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय... या सगळ्यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस कामाला लागलेत. गेल्या चार दिवसांत फडणवीसांच्या घरी कुणी आणि का भेट घेतली जाणून घेवूया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

12 एप्रिलला माढाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि माणचे आमदार जयकुमार गोरे खास विमानानं नागपूरला पोहोचले. माढामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर महायुतीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. 13 एप्रिलला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाही. त्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. त्याचदिवशी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही त्यांची भेट घेतली. कराड हे संभाजीनगरमधून भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडं आहे.


14 एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्गमधील शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार किरण सामंत नागपूरला पोहोचले. त्यांची फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली, ते समजू शकलं नाही. मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा धडाका सुरू केलाय... त्याबाबत सामंतांनी तक्रार केल्याचं समजतंय.


माढा मतदारसंघ सध्या भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरतोय. धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतल्यानं माढाचा तिढा आणखीच वाढलाय. त्यात उत्तमराव जानकरही नाराज झालेत. त्यांच्या नाराजीचा फटका माढा आणि सोलापुरात बसू शकतो. त्यामुळं फडणवीसांना त्यांना नागपूरला बोलावून घेतलं आणि त्यांची समजूत काढली.


त्याशिवाय काँग्रेस नेते आबा बागुल यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्याची माहिती समजतेय. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. आबा बागुलांसोबत त्यांची दोन मुलं अमित आणि हेमंत बागुलही उपस्थित होते. आबा बागुल हे पुण्यातून काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज आहेत... मात्र, भेटीमागे राजकीय कारण नसल्याचा दावा बागुल कुटुंबीयांनी केलाय... एका लग्न समारंभात भेट झाल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आलीय.



लोकसभेला महाराष्ट्रातून खासदारांची संख्या 45 पार नेण्याचा विडा महायुतीच्या नेत्यांनी उचललाय. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची हॅटट्रिक साधण्यासाठी हा आकडा भाजपला गाठावाच लागेल... त्यासाठीच देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. त्यांच्या शिष्टाईला किती सफल होते, यावर भाजपचं यशापयश अवलंबून असणार आहे.