मुंबईच्या मालाडमध्ये एका मुलीने मासिक पाळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही मुलगी फक्त 14 वर्षांची होती. ती कधीच शाळेतही गेलेली नव्हती. मासिक पाळी आल्यानंतर तिच्या आईने तिला ही सामान्य बाब असल्याचं सांगितलं. मात्र मुलीला तणाव सहन न झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली असल्याचा दावा कुटुंबाने केली आहे. दरम्यान यानंतर देशात पुन्हा एकदा मासिक पाळीबद्दलची जनजागृती करण्याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मुलगी मुंबईच्या मालाड भागात वास्तव्यास होती. चाळीत ती आपल्या कुटुंबात राहत होती. 26 मार्चला तिचा मृत्यू झाला. "ती फार तणावात होती. आम्ही तिला घऱी एकटं सोडायला नको होतं. तिला फार वेदना होत होत्या. तिला काय झालं हे समजलं नाही. तिला मी ही सामान्य गोष्ट असल्याचं सांगितलं होतं. ती इतकं मोठं पाऊल उचलेलं असं वाटलं नव्हतं," असं तिच्या आईने म्हटलं आहे. दरम्यान पोलिसांनी आपण शेजाऱ्यांचा जबाब नोंदवणार असून, या प्रकरणाचा तपास करु असं सांगितलं आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून याच भागात आरोग्याच्या समस्यांवर काम करणाऱ्या सुमिता बेलारे यांनी महिला आणि मुली पाळी किंवा मासिक पाळी हा शब्दही बोलण्यास टाळाटाळ करतात अशी खंत व्यक्त केली आहे. "मुली मासिक पाळीचा उल्लेख पाणी असा करतात. आम्ही जेव्हा या विषयावर कार्यशाळा घेतो, तेव्हा कुटुंबातील सदस्य मुलींना किंवा महिलांना पाठवत नाहीत आणि त्या काय करतील? अशी विचारणा करतात. हे तर सर्रास आहे. का बोलावं असा विचार करतात. त्याकडे तुच्छतेने पाहिलं जातं. मला हे सर्व पाहून फार आश्चर्य वाटतं. ही विचारसरणी केवळ आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांमध्येच नाही तर जवळपास प्रत्येक वर्गातील महिलांमध्ये आहे," असं मालाड युवा संस्थेच्या सुमिता बेलारे यांनी सांगितलं आहे. 


शिक्षक प्रतिक थोरात यांनी हा महत्वाची आणि सामान्य बाब असून शाळेत अनिवार्य करण्याची गरज असल्याचं मत मांडलं आहे. "मराठवाड्यातील एका मुलीने वडिलांनी देवाने तुला शिक्षा दिलं आहे असं आपल्याला सांगितल्याची माहिती दिली होती. त्यामुळे ती शाळेत जात नव्हती. पाळीला शिक्षा म्हटलं जात आहे. मासिक पाळी आणि शरिरातील अवयवांची माहिती देणं पहिलीपासून अनिवार्य केलं पाहिजे. यानंतरच विचारात बदल होईल," असं मत थोरात यांनी मांडलं आहे.