Crime News: सध्या सोशल मीडियाचा (Social Media) जमाना आहे. ज्याप्रमाणे मोबाइल ही प्रत्येकाची गरज झाली आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आपली उपस्थिती असणंही तितकंच प्रत्येकासाठी महत्त्वाचं झालं आहे. सोशल मीडियामुळे आपण अशा अनेक अनोळखी लोकांच्या संपर्कात येतो ज्यांना आपण कदाचित कधीच भेटलो नसतो. यातून अनेकदा चांगले मित्र, आयुष्याचे साथीदार, मार्गदर्शक भेटतात. पण याची दुसरी बाजूही तितकीच भयानक आहे. अनेकदा याचा फायदा घेत फसवणूक होण्याची भीती असते. विरारमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली असून ही वाचल्यानंतर तुम्हीही सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्याल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरारमध्ये Instagram वरील मित्राने तरुणीला राजस्थानात (Rajasthan)  विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.


पीडित तरुणीची Instagram वर दिनेश पुरी नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. त्याने तिला पोलीस दलात नोकरीला लावण्याचं आमिष दाखवलं होतं. त्यानुसार तो तिला घेऊन औरंगाबाद येथे गेला होता. तिथे नेल्यानंतर त्याने तिला राजस्थान राज्यातील बाडमेर येथील रहिवाशी चेतन भारती याच्याकडे तिला विकलं. लग्नासाठी त्याने दोन लाखात तिची विक्री केली. तरुणीची इच्छा नसतानाही तिला घऱात डांबून ठेवण्यात आलं होतं.


दरम्यान कामानिमित्त घराबाहेर पडलेली तरुणी बेपत्ता झाल्याने कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुटुंबाने अर्नाळा पोलीस ठाण्यात तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तरुणीचा शोध घेत पोलीस राजस्थानपर्यंत पोहोचले आणि या रॅकेटचा भांडाफोड झाला.