नवी मुंबईत 23 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपी तरुणाने मुलीला गर्भवती करत नंतर आत्महत्येला भाग पाडलं. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शाळेत शिपाई म्हणून काम करतो. अटकेनंतर कोर्टात हजर केलं असता 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला गोवंडीतून अटक केली. आरोपीविरोधात कलम 305 (अल्पवयीन मुलीला आत्महत्येसाठी भाग पाडणे), 376 (2) (वारंवार अत्याचार) आणइ लहान मुलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणाऱ्या पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत शिपाई असणाऱ्या आरोपीने 17 वर्षीय तरुणीशी कथितपणे मैत्री केली होती. यानंतर त्याने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत गर्भवती केलं. अखेर त्रासलेल्या मुलीने 28 नोव्हेंबरला घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कोर्टात हजर केलं असता 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.