`माझ्याशी लग्न करणार का?,` शिक्षिकेने नकार दिल्यानंतर शाळेच्या आवारातच नको ते घडलं; थेट शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल
रमाणी आणि मधन यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच त्यांच्या लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती, मात्र तिने लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता, असं चौकशीत समोर आलं आहे.
तामिळनाडूमधील थंजावूर येथे एका 26 वर्षीय शिक्षिकेची हत्या करण्यात आली. शिक्षिकेने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तरुणाने तिची हत्या केली. शाळेच्या आवारातच हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. रमाणी असं या 26 वर्षीय शिक्षिकेचं नाव आहे. 30 वर्षीय मधनने मल्लिपट्टणम सरकारी शाळेत रमाणीवर हल्ला केला. हल्ल्यात तिच्या मानेला गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला रुग्णालयात नेलं जात होतं. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मधनला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. वैयक्तिक कारणामुळे हत्या करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. चौकशीत समोर आलं आहे की, रमाणी आणि माधन यांचं कुटुंब लग्नाच्या चर्चेसाठी भेटल होतं. पण रमाणीने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. नकार दिल्याने मधन संतापला होता. याच संताप आणि नाराजीतून त्याने शाळा गाठली आणि धारदार शस्त्राने हल्ला केला.
शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोयामीझी यांनी या घटनेचा निषेध केला असून विद्यार्थ्यांचे तातडीने समुपदेशन करण्याचे आदेश दिले आहेत. शालेय शिक्षण मंत्री तात्काळ तंजावरला निघाले आहेत. त्यांनी संशयितावर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
"तंजावर जिल्ह्यातील मल्लीपट्टणम सरकारी शाळेत काम करणाऱ्या रमाणी या शिक्षिकेवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. शिक्षकांवरील हिंसाचार सहन केला जाऊ शकत नाही. हल्लेखोरावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्ही शोकग्रस्त कुटुंब, विद्यार्थी, यांच्याप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो," असं ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत.