प्रताप नाईक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Crime News: कोल्हापुरात (Kolhapur) एका कुटुंबावर शेजाऱ्यानेच तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात आझाद मुकबुल मुलतानी (50 ) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची 22 वर्षीय सून असिफ मुलतानी जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी निखिल गवळी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. 


करणी केल्याच्या संशयावरून आरोपी निखिल गवळी याने मंगळवारी रात्री शेजाऱ्यांवर तलवार हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. सेंट्रिंग कामगार असणाऱ्या आझाद मुकबुल मुलतानी (50) यांची त्याने हत्या केली आहे. दरम्यान सासऱ्यावर होणारे वार अडविण्यासाठी गेलेली सून असिफ मुलतानी (22) या हल्ल्यात जखमी झाली आहे. निखिल गवळी याने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांकडे हत्येची कबुली दिली आहे.


कोल्हापुरातील टेंबलाई उड्डाण पुलाशेजारील मोठी झोपडपट्टी आहे. त्याच ठिकाणी आरोपी निखिल गवळी आणि मुतलानी कुटुंबे राहतात. मुलतानी हे सेंट्रिंग काम करतात. त्यांच्या घराशेजारी राहणारा निखिल गवळी हा तरुण टेम्पोचालक आहे. त्याला दारु आणि अंमली पदार्थाचे व्यसन आहे. व्यसनाधिन निखिल गवळी हा चौकात राहणार्‍या नागरिकांना शिवीगाळ करणे, अंगावर धाऊन जाणे असे प्रकार करत होता. त्याच्या या वागणूकीने नागरिक त्रस्त झाले होते. 


रात्री साडेआठच्या सुमारास निखिल घरी आला. तेव्हा बोळातील सर्व घरांचे दरवाजे बंद होते पण शेजारील मुलतानी यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. बाहेरच्या खोलीत मृत आझाद, त्यांची पत्नी रेहाना, सून आयेशा, अफसाना आणि एक लहान मुलगा असे एकत्रित जेवायला बसले होते. यावेळी अचानक निखिल तलवार घेवून त्यांच्या घरात घुसला आणि थेट आझादवर सपासप वार केले. हे वार वाचविण्यासाठी सून अफसाने निखिलला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निखिलने तिच्यावर देखील हल्ला चढविला. भांबवलेल्या इतर कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर मात्र निखिल तलवार घेवून निघून गेला. जखमी अवस्थेत आझाद आणि त्यांची सून यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी आझाद यांना उपचारापूर्वी मृत्यू घोषित केले.


यादरम्यान आरोपी निखिल थेट पोलीस ठाण्यात हजर झाला आणि शेजारील आझाद मुलतानी करणी करत असल्यामुळे त्यांचा खून केल्याची कबुली राजारामपुरी पोलिसांना दिली. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून, शोककळा पसरली आहे