Parbhani Girl Child News: (Motherhood) मातृत्वं म्हणजे पूनर्जन्माची चाहूल. महिलेला मिळणारं नवं आयुष्य आणि एक नवखा अनुभव. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांच्या शरीरातच नव्हे, तर त्यांच्या जगण्यामध्येही मोठे बदल होतात. एक जीव आपल्या गर्भात वाढवण्यापासून त्याला जन्म देईपर्यंतचा काळ अतिशय आव्हानात्मक असतो. पण, चेहऱ्यावर स्मित ठेवत आनंदानं तेसुद्धा सहन करणारी हीच ती 'माय'. अशाच मातृत्तावाचा सन्मान करण्याची शिकवण आपल्याला दिली जाते. पण, तुम्हीच सांगा किती ठिकाणी करंच महिलांचा आणि त्यातही मुलींना जन्म देणाऱ्या महिलांचा आदर केला जातो? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी अनेक कुटुंब (Family), अनेक ठिकाणं आणि अनेक समुदाय असेही आहेत जिथं एखाद्या महिलेच्या पोटी मुलीचा जन्म (Girl Child) झाला तर तिला हीन वागणूक दिली जाते. त्या जन्मलेल्या लेकिचाही तिरस्कार केला जातो. काही ठिकाणी परिस्थिती इतकी वाईट, की गर्भवती महिला आपल्या पोटी मुलगी जन्मायला नको अशी प्रार्थना करतात. त्यातूनही लेकीचा जन्म झालाच तर हाती निराशा. 


समाजाला आरसा दाखवणार हा अवलिया कोण? 


जिथं आज 21 व्या शतकातही समाज अधोगतीच्याच वाटेवर जात आहे तिथेच परभणीतील (Parbhani) एक अवलिया त्याच्या दानशूर वृत्तीनं आणि विचारांनी सर्वांची मनं जिंकत आहे. नाही म्हणता या समाजाला आरसा दाखवत आहे. या व्यक्तीचं नाव आहे धर्मवीर दामोदर. नुकतंच माध्यमांमध्ये त्यांचं नाव समोर आलं आणि अनेकांनीच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. 


'हरियाणा जिलेबी सेंटर' असं दुकान चालवणाऱ्या या जिलबी विक्रेत्या धर्मवीर दामोदर अर्थात सनी सिंग यांनी एक वेगळाच पायंडा पाडला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला जन्मणाऱ्या मुलींच्या कुटुंबीयांना ते जिलबी वाटतात. इतकंच नव्हे, तर यातून लकी ड्रॉ पद्धतीनं नाव येणाऱ्या एका नवजात मुलीच्या कुटुंबाकडे ते भेट म्हणून चक्क सोन्याचं नाणं देतात. गेल्या 12 वर्षांपासून सनी यांनी अशा कुटुंबांना जिलबी आणि सोन्याची नाणी वाटली. 


हेसुद्धा वाचा :Accident News : ध्यानी मनि नसताना घडली विपरीत घटना, 'तिच्या' आसुसलेल्या स्वप्नांवर काळाचा घात


2023 म्हणजेच यंदाच्या वर्षी 1 जानेवारीला त्यांनी 13 कुटुंबांना जिलबी वाटत त्यांचं तोंड गोड केलं. आपल्यालाही मुलगी हवी होती, पण तसं झालं नाही. त्यामुळं समाजात मुलींच्या जन्माचाही आनंद साजरा केला गेला पाहिजे या भावनेनं सिंग यांनी हा अनोखा उपक्रम साजरा करत अनेक कुटुंबाशी घट्ट नातं बांधलं. 



काहीही नातेसंबंध नसताना एका अनुकरणीय विचारानं हे जिलबीवाले खऱ्या अर्थानं अनेकांच्याच आयुष्यात गोडवा आणत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.