मुंबई : अभिनय क्षेत्राक़डून राजकीय विश्वाकडे वळलेल्या अभिवेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील विधान करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत ५७ वर्षीय इसम हा मुळचा पुण्याचा आहे. त्याने उर्मिलाविरोधात केलेल्या या विधानामुळे विश्रामबाग पोलिस स्थानकात हा त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. धनंजय कुडतरकर असं त्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्मिला यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या त्या व्यक्तीविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३५४ (अ) १ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीला अद्यापही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही. या प्रकरणी तपास सुरु असल्यामुळे त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 


अभिनय विश्वातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यंदाच्या लोकसभा निव़डणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांनी ही निवडणूक लढवत भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्यापुढे आव्हान उभं केलं होतं. या मतदारसंघातून शेट्टी यांचा विजय झाला. राजकारणाच्या पदार्पणातच उर्मिला यांना पराभवाचा धक्का बसला. पण, तरीही यापुढेही राजकीय कारकिर्दीत सक्रीय राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. राजकीय विश्वात प्रवेश केल्यापासून मातोंडकर यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्याही वाढली. पण, आपल्यावर होणाऱ्या या टीका मात्र त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने परतवून लावल्या होत्या.