बीड : बीड जिल्ह्यात इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या मंगेश वाळकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. आपल्या वडिलांविषयी त्याने लिहिलेला निबंध अनेकांचं मन हेलावत आहे. त्याच्या शाळेच्याच मुख्याध्यापकांनी हा निबंध व्हॉट्स अपवर पोस्ट केल्यानंतर मंगेशला मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिनाभरापूर्वीच त्याच्यावर असणारं वडिलांचं छत्र हरपलं आणि मंगेश पोरका झाला. त्याच वडिलांविषयीचं प्रेम अन् मायेची भावना त्याने लिहिलेल्या निबंधातून समोर आली आहे. मंगेशचा निबंध वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 


'माझं नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचं नाव परमेश्वर वाळके असं होतं. माझ्या पप्पांना टीबी आजार झाला होता म्हणून मला माझ्या मम्मीने मामाच्या गावाला पाठवले होते. माझे पप्पा वारले, माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे, वही पेन आणायचे. माझे लाड करायचे. मला माझे पप्पा खूप आवडत होते. माझे पप्पा १८ डिसेंबरला वारले. माझी मम्मी खूप रडली. मीसुद्धा खूप रडलो. तेव्हा आमच्या घरी पाहुणे आले होते. माझे पप्पा मला म्हणाले तू साहेब हो, अभ्यास कर, पप्पा नसल्यामुळे कुणीच मदत करत नाही. मला पप्पांची आठवण येते. आम्हाला रात्री चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर परत या...', असे त्या निबंधातील शब्द. 


आष्टी तालुक्यातील वाळकेवडी या गावातील मंगेश वाळके याने शाळेच्या वर्गात निबंध लिहिताना आपल्या वडिलांच्या आठवणी जागवल्या, तो निबंध वाचल्यानंतर त्याच्या मुख्यध्यपिका नजमा शेख यांच्या डोळ्यात पाणी आलं. मंगेशचा हा निबंध वाचल्यानंतर त्याच्या मुख्य़ाध्यापक नजमा शेख यांनी तो त्यांच्या व्हॉट्सएपच्या ग्रुपवर पोस्ट केला आणि मंगेशला मदत करण्याच आवाहन केलं. या मंडळींनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीय. असं असलं तरीही मंगेशच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतरांनीही त्याच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.