मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत संसर्गाची गती रोखण्यासाठी सर्व राज्यांचे सरकार कडक नियम लागू करत आहेत. अशातच काही राज्यांनी लॉकडाऊन, वीकएंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यू लावल्याने पोलिसांनी देखील कडकपणा दाखवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबईत कलम 144 लागू करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या परिस्थितीमुळे एक तरूण आपल्या प्रेयसीला भेटू शकला नाही, त्यामुळे त्याला तिची खूप आठवण येत आहे. जेव्हा त्याला काहीच सुचले नाही, तेव्हा त्याने पोलिसांना मदतीसाठी विनंती केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या तरुणाला जे उत्तर दिले त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होत आहे.


मुंबईत सध्या सीआरपीसी कलम 144 लागू आहे. ज्यामुळे बर्‍याच ठिकाणी निर्बंध लावले आहेत. आपात्कालीन आणि अत्यावश्यक सेवांमध्ये व्यस्त असलेल्या वाहनांसाठी पोलिसांनी वेगवेगळ्या रंगांचे स्टिकर जारी केले आहेत. अशा परिस्थितीत अस्वस्थ तरूणाने आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवर पोलिसांकडून मदत मागितली. अश्विन विनोद नावाच्या व्यक्तीने ट्वीटरवरुन मुंबई पोलिसांना ट्वीट करून लिहिले की, "मुंबई पोलिस मी माझ्या मैत्रिणीला भेटायला कुठले स्टिकर वापरु? मला तिची खूप आठवण येत आहे."


युवकाच्या या ट्वीटवर मुंबई पोलिसांनीही त्याला मजेदार पद्धतीने उत्तर दिले. मुंबई पोलिसांनी ट्वीट केले की, "आम्ही समजू शकतो की, हे तुमच्यासाठी आवश्यक आहे सर, परंतु दुर्दैवाने ते आमच्या अत्यावश्यक आणि आपत्कालीन श्रेणीत येत नाही. लांब राहिल्याने तुमची मने एकत्र येतील आणि यावेळी आपल्याला निरोगी देखील ठेवतील. आम्ही आशा करतो की, तुम्ही नेहमी एकत्र राहाल. परंतु हा एक टप्पा आहे."



मुंबई पोलिसांचे योग्य उत्तर


मुंबई पोलिसांचे हे मजेदार उत्तर सोशल मीडियावर लोक पसंत करत आहेत. पोलिसांच्या या प्रतिसादाचे लोकांकडून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही लोक हे ट्वीट केवळ शेअर करत नाहीत तर, त्यावर विविध प्रतिक्रिया आणि कमेंन्ट्स देत आहेत. काही यूझर्सनी या तरुणाला संयम ठेवायला सांगितला तर काहींनी त्याच्या मूर्खपणावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.



हे प्रकरण इतके व्हायरल झाले आहे की, केवळ या व्यक्तीचे नावच नाही तर त्याचे ट्वीटर अकाऊंटही ट्वीटरवर ट्रेंड होत आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स आणि विनोद शेअर करत आहेत.