अशी वेळ कुणावरच येऊ नये; लोकलचा रोजचा प्रवास पण `त्या` दिवशी विपरीत घडलं
लोकलने नियमीत प्रवास करणाऱ्या एका तरुणासह धक्कादायक प्रकार घडला आहे. विचित्र घटनेत या तरुणाने आपले दोन्ही पाय गमावले आहेत.
mumbai local train accident : लोकलही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. लोकल प्रवास कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना मध्य रेल्वे मार्गावर घडली आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या तरुणावर टवाळखोरांनी हल्ला केला. यात या तरुणाने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या या तरुणाचा संसार फुलण्याआधीच त्याला आयुष्यभराचे अपंगत्व आले आहे. या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला आर्थिक मदतीची गरज आहे.
जगन जंगले (वय 31 वर्षे) असे या अपघातग्रतस्त तरुणाचे नाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातील, निसोबाचा सडा, पळसंब खालचीवाडी येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील जगन याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली. अशोकवन, चाळ क्रमांक ७, रूम नंबर ५, विजय नगर, अमराई, कल्याण पूर्व येथे भाड्याच्या घरात तो राहतो. दादर पश्चिम येथील मॅजेस्टिक बुक सेंटर येथे महिना १५,०००/ पगार असणारी खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते. सकाळी कल्याण ते दादर व रात्री दादर ते कल्याण असा नियमितचा प्रवास. हल्लीच फेब्रुवारी महिन्याच्या 17 तारखेला त्यांचा विवाह होऊन त्यांनी आपला संसार थाटला होता.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
नियमितप्रमाणे जगन जंगले 23 मे 2024 रोजी आपले काम आटपून रात्री 9 वाजता दादर ते कल्याण असा लोकलने आपल्या घरचा प्रवास करत होते. ट्रेन ला प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा टवाळखोर टोळक्याने मोबाईल चोरीच्या उद्देशाने घेतला. ट्रेन ठाणे स्टेशनवरून कळव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून अंदाजे 200 मीटर पुढे (कळव्याच्या दिशेने ) ट्रेन खूप स्लो झाली असताना टवाळखोरांनी चोरीच्या उद्देशाने दांड्याने जोरात आघात केला. तो दांडा गेटवर उभे असलेल्या जगन जंगले याच्या हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन तो खाली पडला. त्यांचे दोन्ही पाय ट्रेनखाली सापडले. तेथील उपस्थित लोकांनी जगन यांना लक्षात असणारा नंबर लावून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रथम कळवा येथील शासकीय रुग्णालयात नेले परंतु तेथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपचार नसल्याने ठाणे येथील प्रायव्हेट रुग्णालयात हलविण्यात आले कारण तत्काळ उपचार होणे गरजेचे होते.
सध्या त्याच्यावर ठाणे पश्चिम येथील हायलंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ढोकाळी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या दोन्ही पायांचे ऑपरेशन करून दोन्ही पाय काढण्यात आले. परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या, नुकताच आपला प्रपंच थाटलेल्या, आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या एका गरीब युवकावर या वयात ओढवलेला प्रसंग हा खरंच मन हेलावणारा आहे. दोन्ही पाय गेल्याने अपंगत्व आले. कुटुंबासाठी आधार बनलेले हात कुठेतरी थांबले. अशी वेळ कोणावरही येऊ नये. जगन याला या संकटातून बाहरे पडण्यासाठी आर्थिक सहाय्याची गरज आहे.