विरारः  विरारमध्ये एका दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रचिती पाटील ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे तिच्यावर हल्ला करणारी आरोपी ही महिला असल्याचं समजतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार पश्चिमेच्या फलाट क्रमांक एकला लागून सुनील गुप्ता यांचे दुकान आहे. या दुकानात प्रचिती पाटील ही तरुणी काम करते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ती दुकानात काम करत असताना एक अनोळखी तरुणी दुकानात आली व काही वेळातच तिने आपल्याकडील कोयत्याने प्रचितीवर हल्ला केला. यात प्रगती गंभीर जखमी झाली. 


प्रचितीचा आवाज ऐकून परिसरातील इतर लोक धावत दुकानात आले. तेव्हा प्रचिती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला उपचारासाठी जवळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर तरुणीला स्थानिकांच्या मदतीने पकडून विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 


विरार पोलिसांनी या हल्लेखोर तरुणीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दुकानात दोन ग्राहकांमध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्याच वादाच्या रागात या तरुणीने हल्ला केला असल्याची शक्यता दुकान मालकाने वर्तवली आहे. तर, हल्लेखोर तरुणी याच परिसरात राहत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या तरुणी पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 



पुण्यातपण घडली अशीच घटना


पुण्यातील विमानतळ परिसरात फ्री सिगारेट दिली नाही म्हणून हॉटेल चालकाला कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं आहे.या प्रकरणी पोलिसांनी चेतन बसवराज चितापुरे वय 22 राहणार मोझे आळी लोहंगाव पुणे याला अटक केली आहे. आरोपीने फिर्यादीच्या कानावर डोक्यास मानेवर, डावा, उजव्या हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी 14 जुलै रोजी पहाटे 4 वाजल्याच्या सुमारास घडला आहे.