सैन्य भरतीसाठी अपात्र ठरल्यानंतर तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, Vande Bharat Express समोर मारली उडी
Bhandara Suicide: भंडारा येथे तरुणाने वंदे भारत एक्स्प्रेससमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. सैन्यात भरती होऊ न शकल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
प्रवीण तांडेकर, भंडारा
Bhandara Suicide: भंडारा येथे एका तरुणाने वंदे भारत एक्स्प्रेससमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर एकलारी परिसरातील रेल्वे मार्गावर तरुणाने वंदे भारत एक्स्प्रेससमोर उडी मारुन आत्महत्या केली. रुपेश चंद्रशेखर साठवणे असं तरुणाचं नाव आहे.
सदर तरुण हा मोहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी आहे. तरुणाचे सैन्य भरतीसाठी प्रयत्न सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्याचे मित्र सैन्य भरतीसाठी पात्र ठरले होते. पण मृतक मात्र अपात्र ठरला होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा
सीएसएमटी-साई नगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असून सीएसएमटी येथे वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला जाण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी 10 फेब्रवारीला मुंबईत एका कार्यक्रमासाठी येणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ साडे सहा तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसने प्रवास करायचा म्हटलं तर मुंबई ते सोलापूर अंतरासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधूनही पाच तास ५५ मिनिटांचा प्रवास होणार आहे.
मुंबई – शिर्डी मार्गावरही लवकरच ‘वंदे भारत’
सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आठवडय़ातील सहा दिवस धावणार आहे. हा प्रवास ५ तास ५५ मिनिटांचा असणार आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीतून सायंकाळी सव्वा सहा वाजता सुटून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. दादर, ठाणे, नाशिक रोडला ही एक्स्प्रेस थांबेल.
नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक
वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवरही दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. कळमना ते कामठीदरम्यान गाडीवर रविवारी दगडफेक झाली होती.