आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी सेनेमुळेच होईल- प्रकाश आंबेडकर
आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी सेनेमुळेच होईल असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
मुंबई : आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी सेनेमुळेच होईल असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून शिवसेनेने समोर केले आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरल्याचेही सेना नेत्यांकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी हे वक्तव्य केले. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांची जबाबदारी आहे. यासाठी त्यांनी झटायला हवे. नाहीतर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल असे ते म्हणाले.
युतीची शक्यता कायम
आगामी विधानसभा निवडणुकीत युती करायची की नाही, याबद्दल असदुद्दीन ओवैसी आणि माझ्यात थेट बोलणी सुरु आहेत. उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील युतीची शक्यता कायम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत अजूनही बोलणी सुरु असल्याचा खुलासा केला. काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी 'आमची आघाडी ओवैसींसोबत झालीये, महाराष्ट्रातील नेत्यांसोबत झालेली नाही' असे सांगत इम्तियाज जलील यांना टोला लगावला होता.
इम्तियाज जलील यांनीदेखील प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले होते. मी प्रदेशाध्यक्ष असून मलादेखील काही अधिकार आहेत. मी असदुद्दीन ओवैसी यांना विचारून निर्णय घेतल्याचा दावा जलील यांनी केला होता.