माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया : कबड्डी म्हणजे मातीत खेळला जाणारा खेळ... प्रो कबड्डीमुळं या खेळाला कॉर्पोरेट महत्त्व आलंय... पण, अशी कबड्डी तुम्ही नक्कीच पाहिली नसेल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साडीचा पदर खोचून आणि काश्टा गुंडाळून मैदानात उतरलेल्यात आदिवासी महिला... आणि त्यांचा उत्साह वाढवणारे प्रेक्षक... गोंदिया जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेल्या भजेपार गावातलं हे थरारक दृश्य... फक्त चूल आणि मूल हेच ज्यांचं विश्व आहे, चार भिंतीबाहेरचं जग ज्यांनी कधी पाहिलं नाही, त्या चक्क शड्डू ठोकून मैदानात उतरल्यात... हुतूतू तूतू करत एकमेकींची धरपकड करतायत.


भजेपार गावातील महिलांना आपली खेळाडूवृत्ती दाखविण्याचं व्यासपीठ यानिमित्तानं मिळालं. दुर्गम आदिवासी भागातील कबड्डीचे हे सामने पाहण्यासाठी प्रो कबड्डीफेम खेळाडू प्रीतम छिल्लर आणि प्रमोद नवरालही आवर्जून उपस्थित होते. त्यामुळं खेळाडूंच्या जोशात आणखी भर पडली...


स्वदेशी खेळांना  चालना मिळावी यासाठी सूर्योदय क्रीडा मंडळ गेल्या सात वर्षांपासून कबड्डी सामन्यांचं आयोजन करतंय. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील ७० पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते.


या आंतरराज्यीय कबड्डी स्पर्धेत नागपूरचा संघ विजेता ठरला, तर छत्तीसगढनं उपविजेतेपद पटकावलं. पण, त्यापेक्षाही या स्पर्धेतील खऱ्या विजेत्या होत्या... त्या साडी खोचून कबड्डी कबड्डी करणाऱ्या आदिवासी महिला... त्यांच्या खिलाडूवृत्तीला 'झी २४ तास'चा सलाम...